नवी मुंबईतील २९ गावांत बांधण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आता प्रकल्पग्रस्तांच्या मुळावर उठू लागली असल्याने मॅक्सीवर बंदीसारखे महम्मद तुघलकी निर्णय घेण्याची वेळ गावातील मंडळावर आली आहे. भाडय़ाने घरे देण्याच्या हव्यासापोटी प्रकल्पग्रस्तांनी अनेक गुन्हेगार प्रवृतीच्या रहिवाशांना शेजारी पोसले असून आता ‘हटाव मॅक्सी बचाव गाव’सारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे निर्णय रहिवाशांवर लादले जात आहेत. त्याचा अनेक नागरिकांनी निषेध केला आहे.

राज्य शासनाने संपादन करून दिलेली नवी मुंबईतील हजारो हेक्टर जमीन सांभाळण्यात सिडको अपयशी ठरल्याने सिडकोला दिलेल्या जमिनीवर आता प्रकल्पग्रस्तांनी मोठय़ा प्रमाणात अनधिकृत चाळी, इमारती बांधल्या आहेत. स्वस्त आणि मस्त घराच्या या योजनेत अनेक मुंबई, ठाणेकरांनी नवी मुंबईतील या गावात घरे घेणे पसंत केले आहे. या सर्वसामान्य नागरिकांबरोबरच बांगलादेशी घुसखोर, नायजेरियन नागरिक आणि गुन्हेगारी प्रवृतीचे रहिवाशी या चाळी, इमारतीमध्ये राहात आहेत. घरांच्या शेजारी हे गुन्हेगार पोसत असताना गावात मॅक्सीवर फिरणाऱ्या महिलांना दंड ठोठविण्याचा निर्णय गोठवलीतील एका महिला मंडळाने घेतला आहे. त्यामुळे महिलाच महिलांच्या वैरी झाल्याचे चित्र आहे. गावातील एखादे मंडळ असे भारतीय संविधान व अभिव्यक्ती स्वतंत्राच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही, असे तळवलीतील एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्पष्ट केले. शिवसेनेने कधी काळी अशा घोषणा केल्या होत्या. त्यामुळे प्रकल्पग्रस्त महिलांनी त्याची री ओढण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी अशा प्रकारे वेश परिधान करणाऱ्या महिला व पुरुषांना (लुंगी) प्रकल्पग्रस्तांनी चोप दिलेला आहे.