नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली असतानाच मंगळवारी करावे गावात अनधिकृत बांधकामांच्या भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिडकोने डिसेंबर २०१२ पूर्वीच्या सर्व अनधिकृत बांधकामांना कायम करण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून ही बांधकामे कमकुवत आणि निकृष्ट असल्याने कधीही मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील २० हजार अनधिकृत बांधकामे कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी २०१३ नंतरची बांधकामे अनधिकृत ठरवून ती पाडण्याची कार्यवाही सिडको लवकरच करीत असून अशा बांधकामांना नोटीस देण्याचे काम सध्या सुरू आहे. कायम करण्यात आलेली २० हजार बांधकामे ही कोणतेही स्थापत्य निकष पूर्ण करून बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे आराखडे, पाया, छप्पर, बांधकाम नियम पाळणारे नसल्याने ही घरे कधीही कोसळण्याची शक्यता असून मुंब्रा येथील लकी कम्पाऊंडसारखी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करावे गावातील मंगळवारची दुर्घटना या संभाव्य दुर्घटनेची एक झलक असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वी ऐरोली येथील साईनाथवाडी येथे अशाच प्रकारे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या जवळील भिंत कोसळून शेजारच्या घराचा चक्काचूर झाला. सुदैवाने एका रहिवाशाच्या प्रसंगावधानामुळे घरातील लहानग्यांचे जीव वाचले होते. ९५ गावांत व गावाशेजारी बांधण्यात आलेल्या २० हजारांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांचा पाया मजबूत नसल्याने संततधार पावसाने या इमारती जमिनीत खचून जात असून आज ना उद्या कोसळण्याचा धोका वर्तवला जात आहे. ही बांधकामे करताना आजूबाजूला मोकळी जागा सोडण्याचे सौजन्य दाखविण्यात न आल्याने एकमेकांना चिकटून ही बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे गावांना सुधारित झोपडपट्टीचे स्वरूप तयार झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आग्रहास्तव सरसकट अशा सर्वच घरांना शासनाने कायम केल्याने दिघा येथील अनधिकृत बांधकामांवर लवकर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमआयडीसीला दिले आहेत. त्या वेळी ही कारवाई लवकर करा, अन्यथा सरकार ही बांधकामेही कायम करण्याची भीती न्यायालयाने वर्तवली आहे. सिडकोने जूनच्या पहिल्या आठवडय़ात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई सुरू केल्यानंतरही काही ठिकाणी ही बांधकामे छुप्या पद्धतीने सुरू असून पालिका व पोलीस अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

करावे गावातील दुर्घटना
प्रतिनिधी, नवी मुंबई<br />करावे गावात अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सिमेंटच्या विटा बाजूच्या घरावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
करावे गावात शिताबाई दळवी यांच्या जागेत पाच मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या विटांची भिंत चौथ्या मजल्यावर रचण्यात आली होती. मंगळवारी पहाटे सोसाटय़ाच्या वाऱ्याने सिमेंटच्या विटा बाजूच्या घरावर पडल्या. मोठय़ा प्रमाणात विटा खाली पडल्याने पत्रा तुटून खाली घरात झोपलेल्या महेंद्र खंडारे यांच्या अंगावर पडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन वर्षांंची मुलगी समृद्धी हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महेंद्र खंडारे यांच्या पत्नीवर व मुलावर उपचार सुरू असून या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात घरमालक आणि घराचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.