सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान मित्र मंडळांनी अनधिकृत वीज जोडणी घेतली आहे की काय, याची तपासणी महावितरणच्या दामिनी पथकाने सुरू केली असली तरी राजकीय प्रभृतींचा सहभाग असणाऱ्या मंडळांवर कारवाई करताना हे पथकच कचरत असल्याचे दिसत आहे. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अनमोल मेनरोड मित्र मंडळाच्या तपासणीवेळी ही बाब अधोरेखीत झाली. वीज जोडणीबाबत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. जे वीज मीटर दाखविले गेले, त्यावरून मंडळाने वीज जोडणी घेतली की नाही याची स्पष्टता झाली नाही. हे मंडळ कोणाचे आहे ते समजल्यावर दामिनी पथकाला कोणतीही कारवाई न करता पुढील रस्ता पकडावा लागला.
अनधिकृत वीज जोडणीमुळे सुरक्षितता धोक्यात येऊन अपघातही घडू शकतात. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणने गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी, याकरिता आवाहन करून त्यासाठी ‘ऑन लाईन’ सुविधाही उपलब्ध केली होती. गणेशोत्सवादरम्यान दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. अशावेळी अनधिकृत वीज जोडणीमुळे अपघात होऊ शकतो. वीज जोडणीचा चाचणी अहवाल व इतर कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तीन दिवसात वीज जोडणी मंजूर करण्याचे धोरण महावितरणने ठेवले होते. त्याचा लाभ शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतला असला तरी काही मंडळे मात्र अनधिकृत जोडणी घेऊन हा उत्सव साजरा करत असल्याची दाट शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर, महावितरणच्या दामिनी पथकाने ठिकठिकाणी भेटी देऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वीज जोडणी अधिकृत की अनधिकृत याची पडताळणी सुरू केली. अपघात टाळण्यासाठी सुरक्षा आणि वीज चोरीच्या परिणामांची जाणीव मंडळांना करून देण्याची जबाबदारी दामिनी पथकावर सोपविण्यात आली आहे.
तीन सदस्यीय दामिनी पथकाने मंगळवारपासून शहरातील ठिकठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन जोडणी तपासण्याचे काम सुरू केले. महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ परिसरातील मंडळांची छाननी करत हे पथक मेनरोडवर पोहोचले. या ठिकाणी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अनमोल मेनरोड मित्र मंडळाच्या वीज जोडणीची चौकशी करण्यात आली. परंतु, कार्यकर्त्यांकडून त्यांना जोडणीबाबत योग्य ती माहिती देण्यात आली नाही. मंडपास कोणत्या वीज मीटरमधून जोडणी घेतली आहे याची पथकाने विचारणा केली असता त्यांना एक मीटर दर्शविण्यात आले. परंतु, त्यातून वीज जोडणी घेतली असल्याबद्दल खुद्द दामिनी पथकच साशंक असल्याचे दिसले. शहराचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांशी संबंधित हे मंडळ असल्याने पथकाने फारशी कठोर भूमिका न घेता पुढील मंडळांच्या तपासणीसाठी जाणे योग्य समजले. या संदर्भात महावितरणच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी दामिनी पथकाने तपासणीचे काम सुरू केले असले तरी कोणत्या मंडळांवर कारवाई झाली याची माहिती अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात आले. राजकीय व्यक्तींचा सहभाग असलेल्या सार्वजनिक मंडळांवर कारवाई करताना दामिनी पथकच हतबल झाल्याचे दिसत आहे. वास्तविक, ज्या मंडळांनी अनधिकृत वीज जोडणी असल्यास अशा मंडळांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी करताना राजकीय प्रभृत्वाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामना करावा लागत आहे. या संदर्भात महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.