शाळेच्या इमारत दुरुस्तीच्या नावाखाली विद्यार्थिनींची मानसिक छळवणूक होत असल्याची तक्रार माहीमच्या ‘कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूल’ या मुलींच्या शाळेतील पालकांनी केली आहे. मात्र, या प्रकाराची शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा पालकांचा आरोप आहे. कनोसा ही अनुदानित शाळा आहे. तब्बल दोन हजार विद्यार्थिनी या शाळेत शिकत असून त्यापैकी बहुतांश कनिष्ठ वा मध्यमवर्गीय आहेत. गेली दोन वर्षे शाळा मुलींकडून इमारत दुरुस्ती आणि देखभालीसाठी निधी जमा करते आहे. प्रत्येक वर्षी दुरुस्तीच्या नावाखाली अडीच हजार रुपये शाळा मुलांकडून घेते आहे. पालकांची हे पैसे द्यायलाही ना नाही. फक्त दिलेल्या पैशाचा हिशोब शिक्षक पालक संघाच्या बैठकीत देणे आवश्यक आहे. पण, वारंवार मागणी करूनही शाळेने या पैशाचा हिशोब दिलेला नाही, अशी पालकांची तक्रार आहे. त्यामुळे काही पालकांनी पैसे न देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता शाळा ‘तुम्ही पैसे भरले नाहीत. त्यामुळे, दुरूस्त केलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करू नका,’ असे शाळेतील काही मुलींना सुनावते आहे. ज्या मुलींच्या पालकांनी पैसे भरले नाहीत आणि ज्यांचे पालक दबावाला बळी पडू शकतील अशा मुलींना मुख्याध्यापिका आपल्या कार्यालयात बोलावतात. त्यांच्यावर पैसे भरण्यासाठी दबाव आणतात. आणि वर पैसे भरले नाही तर दुरूस्त केलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करू नका, असे सुनावतात, असा आरोप एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला.
‘शाळेचे स्वच्छतागृह, इमारत दुरुस्ती, नवीन संगणक कक्षांची बांधणी आदी कारणासाठी विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे पैसे जमा केले जात आहेत. पण, आपण दिलेल्या पैशाचा शाळेने कसा विनियोग केला याचा जरासाही खुलासा अद्याप शाळेने केलेला नाही,’ अशी तक्रार एका पालकानी केला. ‘शाळेच्या दुरुस्तीकरिता पैसे देण्यास आमचा विरोध नाही. कारण, शेवटी या दुरुस्तीचा उपयोग आमच्याच मुलींना होणार आहे. पण, आधी दिलेल्या पैशाचे ऑडिट दाखविल्याशिवाय आम्ही पैसे देणार नाही,’ अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.या संबधात शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ऑड्री यांच्याशी त्यांच्या कार्यालयात दूरध्वनीवरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, सिस्टर ऑड्री कार्यालयात नाहीत, बाहेर गेल्या आहेत, कामात असल्याने आता बोलू शकत नाहीत, अशा प्रकारची उत्तरे देण्यात आली. यामुळे शाळेची या संदर्भात प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.