शहरामध्ये मोबाइल टॉवर उभारण्यामध्ये नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. मोबाइल टॉवर्समुळे कर्करोगासारख्या भयंकर व्याधी नागरिकांना होत आहेत. याबाबत महापालिकेकडून कारवाई होणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचे कारण फोफावलेल्या मोबाइल टॉवर्सना महापालिकेचा आशीर्वाद असून अधिकारी व टॉवर चालक यांचे अर्थपूर्ण साटेलोटे झालेले आहे, असा आरोप हिंदु युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या वेळी प्रतिष्ठानचे अर्जुन पाटील, मनोज मगदूम, स्वरूप जाधव, सुनील जाधव, संजय पेंटर, रामेश्वर सावंत, महेश मगदूम, चंद्रकांत पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.    
मोबाइल टॉवर्स उभारणीमध्ये महापालिकेडून डोळेझाक होत आहे, असा उल्लेख करून देसाई यांनी टॉवर उभारणीमध्ये दिसून आलेल्या गैरप्रकारांची माहिती दिली. ते म्हणाले, टॉवर उभा करण्यासाठी इमारतीचे ट्रक्चरल डिझाइन तज्ज्ञ इंजिनिअरकडून करणे आवश्यक असताना ते केले गेलेले नाही. वादळ वा अन्य कारणांमुळे टॉवर मानवी वस्तीवर वा उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर कोसळल्यास होणाऱ्या आपत्तिव्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना केलेली नाही. टॉवर्सला वीजपुरवठा करण्यासाठी जनित्राचा वापर केला जातो. त्याच्या इंधनामुळे वायू प्रदूषण होत असताना त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.     
मोबाइल टॉवर्समुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवत आहेत. टॉवर्समधून मोठय़ा प्रमाणात रेडीएशन होत असल्याचे सिद्ध झाले आहे. ते रोखण्याबाबत गाइड लाइन्स उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. १९९८ साली लागू केलेल्या गाइड लाइननुसारच अद्यापही कामकाज सुरू आहे. विदेशामध्ये मोबाइल टॉवर्सची उभारणी मानवी वस्तीबाहेर केली जात असताना आपल्याकडे मात्र मध्यवस्तीमध्ये टॉवर्सची उभारणी केली जात आहे. रंकाळा चौपाटीच्या चार किलोमीटरच्या परिघात ५० ते ६० टॉवर्स उभे असल्याचे दिसतात. अशाप्रकारे सरसकट टॉवर्सना परवानगी देण्यामध्ये महापालिकेचे अधिकारी व एजंट यांचे हात गुंतलेले आहेत. मात्र या व्यवहारामुळे सामान्य नागरिक धोक्याच्या खाईत लोटला जात आहे. यासाठी जागरूक नागरिकांना सोबत घेऊन न्यायालयीन लढा देणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.