भोजनातील चव वाढविणारे गुणकारी सफेद कांदे मिळण्याचे मुंबईतील ठिकाण म्हणजे मालाडचा सोमवार बाजार. केवळ सफेद कांद्यांसाठी भरणाऱ्या सोमवार बाजारवर गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमणच केले आहे. आता तर फेरीवाल्यांनी सोमवार बाजारच्या निमित्ताने तुरेल पाखाडी परिसर कब्जात घेतला आहे. त्यामुळे रहिवाशी हैराण झाले असून जवळच असलेल्या शाळा, रुग्णालयांनाही फेरीवाल्यांच्या कलकलाटाचा त्रास होऊ लागला आहे. वाहतुकीचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. पण या फेरीवाल्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास ना पालिका तयार ना पोलीस. परिणामी सोमवार बाजार आता अतिक्रमणाचा बाजार झाला आहे.
गेली सुमारे ९० वर्षे मालाडमधील तुरेल पाखाडी परिसरात एका बाजूला (आताच्या पन्नालाल घोष मार्गावर) केवळ एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये सोमवार बाजार भरत होता. काही शेतकरी बैलगाडय़ांमधून सफेद कांद्याच्या मळा घेऊन सोमवारी तुरेल पाखाडीत दाखल व्हायचे आणि कांद्याची विक्री करून संध्याकाळी घरी परतायचे. त्यामुळे सोमवार बाजाराचा रहिवाशांना त्रास होत नव्हता. पण गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यानंतर सोमवार बाजार वर्षभर भरू लागला आहे. खाद्यपदार्थ, विविध प्रकारचे पुरुष व महिलांचे कपडे, भांडी, सौंदर्यप्रसाधनाची साधने, भाजी, फळे, स्टेशनरी आदी साहित्याची विक्री सोमवारबाजारमध्ये सुरू झाली आणि त्यात सफेद कांदे हरवून गेले.
तुरेल पाखाडी परिसरातील पन्नालाल घोष मार्गापासून पुढच्या परिसरात सोमवार बाजार भरत होता. पण आता फेरीवाल्यांनी पन्नालाल घोष मार्गासह तुरेल पाखाडी रोडवरही कब्जा केला आहे. फेरीवाले रविवारी संध्याकाळीच या भागात डेरेदाखल होतात. येथील सोसायटय़ांच्या बाहेर रात्री पथाऱ्या पसरतात. सोमवार उजाडल्यानंतर सकाळपासून हा भाग फेरीवाल्यांच्या कलकलाटाने गजबजून जातो. या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसगाडय़ाही या बाजारापासून दूर थांबवाव्या लागत आहेत. बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांचे अतिक्रमण फोफावल्यानंतर या भागात चोऱ्या आणि महिलांच्या छोडछाडीचे प्रकार वाढल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची गाडी कारवाई करण्यासाठी सोमवार बाजारच्या दिशेने निघल्याचे समजताच फेरीवाले तात्काळ आपले साहित्य सोसायटय़ांच्या आवारात लपवण्यास सुरुवात करतात. फेरीवाल्यांच्या दहशतीमुळे त्यास विरोध करण्याची हिंमतही रहिवाशांची होत नाही. या परिसरात दोन छोटी रुग्णालये असून सोमवारी बाजारामुळे रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला तारेवरची कसरत करावी लागते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
फेरीवाल्यांच्या या उच्छादाला तुरेल पाखाडी परिसरातील रहिवाशी कंटाळले असून त्यांनी पालिका आणि स्थानिक पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रार केली. सोमवारी या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पण त्याचा फेरीवाल्यांवर काडीमात्रही परिणाम झालेला नाही. पालिकेच्या कारवाईची दशाही अशीच आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांना आवर घालण्यासाठी सरकारनेच लक्ष घालावे आणि आमची सुटका करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.