तालुक्याला लाभलेली नैसर्गिक संपन्नता, आल्हाददायक वातावरण, धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तालुक्यातील पर्यटन आणि पर्यावरणप्रेमी आणि प्रयत्नशील असताना दुसरीकडे शासनाची उदासीनता आणि दुर्लक्षामुळे धार्मिक स्थळांच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम आणि रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या दगड, खडीसाठी खोदाई होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सृष्टीसौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या उत्खननासाठी मोठय़ा प्रमामात अवैधरित्या सुरूंगाचे स्फोट केले जात आहेत.
कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणाऱ्या कावनई येथील कपिलधारा तीर्थाच्या विकासाबरोबर परिसरातील विकास कामासाठी शासन सर्वार्थाने प्रयत्न करीत आहे. या गावालगतच शिवकालीन किल्ला असून गावाच्या आरंभीच शेगावचे गजानन महाराज यांची पंपासरोवर नामक तपोभूमी आहे. या तपोभूमीबरोबर लगतच्या शिवकालीन कावनई किल्ल्यावर पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत असून हे पाणी बारमाही असते. या ठिकाणापासून काही फुटाच्या अंतरावर पाच वर्षांपासून शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून अवैध सुरूंग स्फोट करून भूगर्भातील दगड काढण्यात येत असून त्यामुळे या ठिकाणच्या नैसर्गिक पाण्याच्या साठा खालावला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या परिसराला या अनधिकृत उत्खननामुळे कुरूपता आली असून या बाबीकडे शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाच्या आरंभी ही खोदाई एका आदिवासी शेतकऱ्याच्या मालकीच्या जागेत सुरू करण्यात आली. परंतु त्यासाठी आवश्यक असणारे पर्यावरण विभागाचे ना हरकतोखले, शासनाचे परवाने संबंधित खाण मालकाने न घेताच तसेच भूसुरूंग स्फोटासाठी पोलिसांचा कोणताही परवाना न घेता विनापरवाना उत्खनन करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे स्वामित्व धन स्थानिक महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे बुडाले असल्याची चर्चा आहे.
अनधिकृत उत्खननापासून हाकेच्या अंतरावर गजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन जालेली तपोभूमी असून लगतच शिवकालीन किल्ला आहे. या दोन्ही ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. उत्खननाप्रसंगी खडक फोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विनापरवाना भूसुरूंग स्फोट घडवून आणले जात असल्याने या भागातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून हे उत्खनन असेच चालू राहिले तर भविष्यात हे सर्व पाणी नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोणताही शासकीय परवाना न घेता मोठय़ा प्रमाणात भूसुरूंग स्फोट होत असताना स्थानिक पोलीस त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसते.
अनधिकृत उत्खननातून निघालेले दगड प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गाच्या कामासाठी वापरला जातो. या दगडाची वाहतूक बिटूर्ली, वाकी मार्गे घोटी-वैतरणा रस्त्यावरून होत असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा संपूर्ण रस्ता नष्ट झाला आहे.