रस्तोरस्ती व गल्लोगल्ली दुचाकी व चारचाकी वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवली जात असल्याने शहरात्र सर्वत्र वाहतूक व्यवस्था बिघडली असून प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून शांत बसले आहे. बेशिस्त वाहतुकीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. त्याचे प्रशासनाला कुठलेही सोयरसुतक नाही.
नागपूर शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ५० लाखावर पोहोचली आहे. प्रति किलोमीटर ८६ वाहने राज्यात आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत शहरात वाहनांची संख्या सुमारे ९.९ टक्क्क्यांनी वाढली. बहुतेक कुटुंबात किमान एक दुचाकी आहे. दुचाकी व चारचाकी (मोटारी) असलेल्या कुटुंबांती संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकसंख्या वाढली व त्याबरोबरच वाहनांची संख्याही प्रचंड वेगाने वाढत आहे. रहाण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहने ठेवण्यासाठीही जागा अपुरी पडू लागली आहे. शहरातील कुठल्याही रस्त्यावर अथवा गल्लीत गेल्यावर दुतर्फा वाहनांची गर्दी दिसते. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा सर्व वाहनांचा त्यात समावेश आहे.
शहरात अनेक इमारती उभ्या झाल्या. इमारतीत वाहने ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वाहने आता रस्त्यांवर उभी ठेवली जात आहेत. वाहने घेतली तरी चालकांन शिस्त लागलेली नाही. वाहने कुठेही आणि कशीही उभी ठेवली जातात. वाहनांची संख्या वाढल्याने दुहेरी व तिहेरी रांगामध्ये वाहने उभी असल्याचे दृश्य सर्वत्र दिसते. ग्रेट नाग रोड सदर रेसिडन्सी रोड, वेस्ट हायकोर्ट रोड, वर्धा रोड, खामला रोड, केळीबाग रोड, टिळक रोड, धारस्कर रोड, महाल, इतवारी, सीताबर्डी, धरमपेठ कुठल्याही भागात वाहने रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी ठेवलेली दिसतात. वाहनतळ पुरेसे नसल्याने आता पदपथावरही वाहने उभी ठेवली जात आहेत.
सुशिक्षित असूनही अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन करीत नाहीत. सर्रास वाहतूक नियम धुडकावून रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पदपथावर वाहने व इतर अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला दुहेरी व तिहेरी पार्किंग यामुळे पायी चालायला जागा उरत नाही. पादचारी रस्त्यावरून पायी चालत असल्याने अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. व्हरायटी चौकात चारचाकी वाहनांनासाठी बहुमजली वाहनतळ सुरू झाले आहे. उड्डाण पुलाखाली तसेच आयनॉक्सशेजारी ‘पे अँड पार्क’ आहे. मात्र, येथेही वाहनांची गर्दी असते. तेथे जागा नसणे, पैसे देण्याची इच्छा नसणे व बेशिस्त यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. वाहतूक पोलीस रस्त्याच्या कडेला उभी दुचाकी वाहने जप्त करतात. चारचाकी वाहन रस्तोरस्तो फिरत असते. मात्र, ही व्यवस्था अपुरी पडते. या सीताबर्डी परिसरातील गल्ल्यांमध्ये हे वाहन फिरत नाही. झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज, व्हरायटी चौक ते लोखंडी पूल या रस्त्यावर वाहन फिरत असले तरी दिवसातून बराच वेळ वाहतूक खोळंबलेली असते.   
शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडली अससल्याचे फेरफटका मारला असता स्पष्ट होते. अतिक्रमण हटाव मोहीम थंडावलेली आहे. पूर्णवेळ वाहतूक पोलीस उपायुक्त नाहीत. अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल्स नाहीत. हे सर्व दिसत असूनही प्रशासन मात्र ढिम्म आहे.