उरण तालुक्यातील तसेच जेएनपीटी बंदर परिसरातील बेकायदा पार्किंगमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक  कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढलेले असताना वाहतूक विभागाने बंदी घालूनही रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला राजरोसपणे बेकायदा पार्किंग सुरू आहे. या पार्किंगवर बंदी घालण्याची मागणी येथील जनतेकडून केली जात आहे.
उरण तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाहनांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. जेएनपीटी बंदरावरील उद्योगांमध्ये असलेल्या गोदामातील मालाची ने-आण करणारी अवजड कंटेनर वाहने येथील द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे नवघर ते खोपटा पुलादरम्यान दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. येथील प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील अनेक प्रवासी वाहने खास करून विद्यार्थी वाहने या मार्गावरून मार्गक्रमणा करीत असताना विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर बेकायदा विरुद्ध दिशेनेही वाहतूक केली जात असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, तर दुसरीकडे उरण-पनवेल रस्त्यावरील जासई ते गव्हाण फाटादरम्यानच्या रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला शेकडो अवजड वाहने पार्क केली जात असल्याने या मार्गावर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जेएनपीटी व सिडकोने वाहनतळ उभारण्याचे आश्वासन दिलेले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने याचा नाहक त्रास या मार्गावरील प्रवाशांना सहन करावा लागत असून अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.