ठाणे स्थानक ते घोडबंदर मार्गावर धावणाऱ्या खासगी बस गाडय़ांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील प्रवास धोकादायक ठरू लागला असून या खासगी वाहतूकदारांनी महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलांच्या पायथ्याला बेकायदा थांबा सुरू केल्याने हे अतिक्रमण वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रेल्वे स्थानक-घोडबंदर मार्गावर होणारी खासगी बसेसची वाहतूक बेकायदा असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असतात. परिवहन विभागाने या वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याने ठाणेकरांनी खासगी वाहतुकीचा हा अवैध मार्ग आपलासा केला आहे. असे असले तरी या बसेसना कोठेही अधिकृत थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बसचालक महामार्गाच्या मधोमध किंवा उड्डाणपुलांच्या पायथ्याशी बिनधोकपणे गाडय़ा थांबवू लागल्याने हे अपघातांना निमंत्रणच ठरू लागले आहे.
प्रवाशांकरिता या बसगाडय़ा महामार्गावरील तीनहात नाका आणि नितीन कंपनीजवळ उभ्या राहू लागल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम ठाणेकर प्रवाशांना दळणवळणाकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे हा प्रवासी वर्ग खासगी बसगाडय़ांकडे वळल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसू लागले आहे. ठाणे शहरातील घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून त्या ठिकाणी रहिवासीही मोठय़ा प्रमाणात राहावयास आले आहेत. घोडबंदर परिसरात महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या बसेस धावतात. या बसेसेवेच्या सुविधेविषयी प्रवासी फारसे समाधानी नसल्याचे चित्र आहे. तसेच या बसगाडय़ा रस्त्यामध्ये बंद पडण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे. त्यामुळे घोडबंदर भागातील प्रवाशांनी खासगी बसगाडय़ांचा पर्याय निवडला आहे. मध्यंतरी अनधिकृत प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या बसगाडय़ांवर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. तसेच या बसगाडय़ांना बंदी घातली होती. मात्र काही दिवसांतच बंदी उठविण्यात आली आणि पुन्हा या बसगाडय़ा रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला असला तरी या बसेसचे चालक महामार्गावर रस्त्याच्या मधोमध तसेच उड्डाण पुलाजवळ प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी बस थांबवीत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याशी संपर्क साधला असता, महामार्गावर थांबून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांविरोधात तक्रारी येऊ लागल्या असून त्याविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या बसगाडय़ांविरोधात यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती आता पुन्हा कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.