दिवाळीनिमित्त निघणाऱ्या हल्लाबोल महोत्सव मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत रायफल बाळगणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलसह दोघांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अन्य एका प्रकरणात निष्काळजीपणे बंदूक चालवून महिलेच्या गंभीर दुखापतीस जबाबदार असणाऱ्या धरमजीतसिंग टेलर याला पोलिसांनी अटक केली.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल वीरेंद्रसिंग बुंगई व टहेलसिंग निर्मले हे दोघे सोमवारी काढण्यात आलेल्या हल्लाबोल मिरवणुकीत रायफल घेऊन मुक्तपणे फिरत होते. दोघांकडे शस्त्र परवाना असला, तरी सार्वजनिक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून हे दोघे उघडपणे शस्त्र बाळगत असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बंदुकीची गोळी लागून महिला जखमी
अन्य एका घटनेत खोब्रागडे नगर परिसरात बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर जखमी झालेल्या बबीता वारकरी (वय ३५) यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हल्लाबोल मिरवणुकीदरम्यान बंदुकीतून झाडलेल्या गोळीने वारकरी गंभीर जखमी झाल्या होत्या. पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे, जमादार श्रीमंगले व कॉन्स्टेबल दिपासिंग यांच्या पथकाने तपासाचे चक्र वेगाने फिरवत या प्रकरणात धरमजितसिंग टेलर याला अटक केली. त्याच्याकडे शस्त्र परवाना असला, तरी त्याचा बेकायदा वापर झाल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली.