जिल्हाधिकाऱ्यांवर वाळू माफियांवर मोक्का लावण्याची मागणी
तालुक्याच्या गिरणा पात्रात अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांकडून तलाठय़ास चिरडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जळगावच्या तलाठय़ाचाच या व्यवसायात सहभाग असल्याचे उघड झाल्यामुळे महसूल यंत्रणेतील अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
धरणगाव तालुक्यातील वैजनाथ येथील गिरणा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला पकडणाऱ्या तलाठय़ावरच चालकाने ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झाला. या घटनेत तलाठी अनिल सुरवाडे गंभीररीत्या जखमी झाले. जिल्ह्य़ात वाळू माफियांकडून तहसीलदाराची जीप पेटविणे, त्यांना मारण्याचा प्रयत्न करणे, गस्ती पथकांवर हल्ले करणे असे प्रकार सातत्याने होत आहेत. अशाच एका प्रकारात तलाठी जखमी झाल्याने असे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. वाळू माफियांना मोक्का लावण्याचीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदन देण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगावचे तलाठी सत्यजित नेमाने यांचाच अवैध वाळू वाहतुकीत सहभाग असल्याचे उघड झाले. जळगावच्या निरवेडी परिसरात अवैधपणे वाळू वाहतूक करणारे नेमाडे नावाच्या व्यक्तीचे डंपर तहसीलदार कैलास देवरे यांनी पकडले असता त्या डंपरमध्ये तलाठी सत्यजित नेमाने यांची भागीदारी असल्याचे उघड झाले. त्यामुळे तलाठी नेमाने यांच्याच सहकार्याने व सहभागाने गिरणा परिसरात अवैधपणे वाळूची तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले.
तलाठी नेमाने यांच्याविषयी आलेल्या अनेक तक्रारी पाहता प्रांताधिकारी अभिजीत पाटील यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच पिंप्राळा येथील मंडल अधिकारी ए. एस. कुलकर्णी यांच्या बद्दलच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांच्या बदलीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
जळगाव जिल्ह्य़ात वाळू माफियांची वाढलेली मुजोरी, गस्ती पथकातील अधिकाऱ्यांवर करण्यात आलेले प्राणघातक हल्ले आणि त्यातून कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले निवेदन, जळगावच्या तलाठय़ाचाच अवैध वाळू वाहतुकीत सहभाग असल्याची बाब उघड होणे या परस्पर विरोधी घटनांमुळे महसूल यंत्रणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जळगाव शहरातील अवैध व्यवसायाबाबतही पोलीस यंत्रणेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.