गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे पर्यावरण मूल्यांकन करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळ अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणाऱ्यांना सध्या मोकळीक मिळाली असून राजरोसपणे वाळूची चोरी केली जात आहे. रविवारी एका वाळू तस्कराने थुगाव येथील तलाठय़ाशी झटापट केल्याची घटना परतवाडा येथे घडली.
पर्यावरण मूल्यांकन समितीचा अहवाल प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील १३२ वाळू घाटांचा लिलाव थांबला आहे. तीन महिन्यांपूर्वी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवण्यात आले होते. जोपर्यंत अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत जिल्हा प्रशासनाला हालचाली करता येणे शक्य नसल्याने वाळू घाटांवर तस्करांना आता मोकळीक मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण १३२ वाळू घाट आहेत. गेल्या वर्षी १२४ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला होता. यावर्षी लिलावाला पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही. गेल्या वर्षीचा रॉयल्टीचा कालावधी ३१ जुलैला संपला. त्यानंतर पावसाळाही आटोपला. दिवाळीपर्यंत सर्वसाधारणपणे वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली जाते, पण नोव्हेंबरचा पंधरवडा उलटूनही वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. मूल्यांकन झाल्यानंतरच ती सुरू होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
वाळू उत्खननाचे क्षेत्र हे पाच हेक्टरपेक्षा कमी असायला हवे. दोन वाळू पट्टय़ांमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक असायला हवे, वाळू घाटावर दोन मीटरपेक्षा अधिक रेती असायला हवी, या अटींच्या आधारे पर्यावरण समिती ही वाळू घाटांना मंजुरी देत असते. जिल्हा प्रशासनाने मंजुरी मिळवण्यासाठी वाळू घाटांचे नकाशे, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा अहवाल आणि प्रस्ताव सादर केला आहे. आता ७४ वाळू घाटांपैकी किती घाटांवर परवानगी मिळते, याकडे बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. वाळू उपसा बंद असल्याने वाळूचे दरही वाढले आहेत. सुरुवातीच्या काळात ट्रकमधील २०० ब्रास वाळू ६ हजार रुपयांमध्ये मिळत होती. हे भाव ८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सरकारी इमारतींचे कामही प्रभावित होत असून बांधकाम क्षेत्रात वाळू घाटांच्या लिलावाची प्रतीक्षा आहे.
रविवारी परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पट्टलवाल लाईन परिसरात थुगाव येथील तलाठी श्रीराम काटकर यांनी अवैधरीत्या वाळू वाहून नेणारा ट्रक अडवला. त्यांनी आपली ओळख देऊन कारवाई सुरू करताच ट्रकचालक संजय चौधरी आणि त्याच्या साथीदाराने काटकर यांच्यासोबत झटापट करून त्यांना खाली पाडले आणि ट्रक घेऊन पळून गेला.
परतवाडा पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालक आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे नोंदवले आहेत. जिल्हा प्रशासनासाठी मात्र हा धोक्याचा इशारा ठरला आहे. वाळू घाटांच्या लिलावासाठी होत असलेला विलंब हा वाळू तस्करांसाठी सुवर्णकाळ ठरू लागला आहे. या अवैध उत्खननामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचण्याची शक्यता आहे.