जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव व येवला परिसरात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून तहसीलदारांच्या अंगावर मालमोटार घालण्याचे प्रकरण ताजे असतानाच संबंधित वाळू माफियाने येवल्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना धमकावून पकडलेली मालमोटार त्यांच्या समक्ष घेऊन जात कायदा व सुव्यवस्थेला जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे.
वाळूने भरलेल्या मालमोटारीचा पाठलाग करणाऱ्या तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्याच्या अंगावर मालमोटार घालण्याचा प्रयत्न नांदगाव तालुक्यातील अनकवाडे शिवारात मंगळवारी घडला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून मनमाड पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले. पोलिसांनी येवला येथील किशोर परदेशी व बंटी परदेशी यांच्यााविरुध्दही याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन चालक ज्ञानेश्वर डंबाळे यांनी तक्रार दिली. येवला-कोटमगाव रस्त्यावर उपविभागीय अधिकारी वासंती माळी व तलाठी प्रतिभा नागलवाड यांनी वाळूने भरलेला डंपर हात देऊन थांबविला. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे काय याची चौकशी केली असता चालकाने डंपर किशोर परदेशी यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. परवान्याबाबत माहिती नसल्याचे सांगून संबंधिताने मालकाला बोलविले.
या घडामोडी सुरू असताना किशोर परदेशी याचा मुलगा बंटी परदेशी टोयोटा गाडीतून घटनास्थळी आला. शासकीय वाहनासमोर त्याने गाडी आडवी करत माळी यांना आमची गाडी पकडते काय, तू कशी नोकरी करते अशी धमकी देत बंटी परदेशी डंपर घेऊन गेला. त्या वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने सहा ब्रास वाळू बल्हेगाव ते मातुलठाण शिवारात रस्त्यावर खाली करून पळ काढला.