तालुक्यातील नागापूरवाडी, तास येथे बेकायदा वाळू उपसा करणारे सहा पोकलेन व सात ट्रॅक्टरवर पारनेर तहसील कार्यालयाच्या पथकाने आज दुपारी कारवाई करून ते ताब्यात घेतले. पथक नदीपात्रात पोहचताच पोकलेन व टॅक्टरचालकांनी तेथून पळ काढला. यावेळी उपस्थित असलेल्या वाळूठेक्याच्या लिलावधारकास नोटीस बजावून पुढील आदेश येईपर्यंत ही उपकरणे व ट्रॅक्टर तेथून हलवू नये असे बजावण्यात आले आहे.  
याबाबतची तक्रार तहसीलदार जयसिंग वळवी यांच्याकडे करण्यात आल्यानंतर नायब तहसीलदार कावरे यांच्या नेतृत्वाखाली मंडलाधिकारी बी. आर. दाते, तलाठी सर्वश्री जी. डी. जाधव, एस. आर. ढगे, बी़  के. भुजबळ, शरद झावरे, प्रशांत सोनवणे, यू. डी. शिंदे यांनी नदीपात्रात जाऊन कारवाई केली.
महसूल खात्याच्या कारवाईने वाळू ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात पाच ठिकाणी वाळूलिलाव झाले असून सर्वच ठेकेदारांनी अशाच पध्दतीने वाळूउपसा सुरू केला आहे. नागापूरवाडी येथे बुधवारी तालुक्यातील काही वाळू वाहतूकदार गाडय़ा भरण्यासाठी गेले होते. गाडीचालकांनी पाच ब्रास वाळूसाठी सहा हजार रूपयांची केली. मात्र ती मान्य न झाल्याने याच वाहतूकदारांनी तहसिलदारांना फोन करून बेकायदेशीर वाळू उत्खननाची माहिती दिली.  
लिलाव झालेल्या पाच ठेक्यांचा ताबा मंडलाधिकारी बी. आर. दाते यांनी दि. ९ मार्च या सुटीच्या दिवशी दिला होता. लिलाव झालेल्या हद्दीबाहेर व निर्धारीत खोलीपेक्षा जास्त वाळू उत्खनन करण्यात येउ नये, यासाठी घटनास्थळी  पंचनाम्याप्रसंगी हद्द निश्चितीच्या खुणा, बॅचमार्क करणे आवश्यक हाते. परंतु अशा खुणा तसेच बॅचमार्क न करताच वाळू उत्खनन सुरू होते. सर्वच ठेकेदार मनमानी पध्दतीने,पोकलेन, जेसीबीसारख्या उपकरणांच्या सहाय्याने बेसुमार वाळू उत्खनन करीत आहेत.