कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत आणि शहराजवळच्या २७ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूमाफियांकडून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमधून लाखो रुपयांची ‘बेगमी’ भूमाफियांकडे जमा होत असल्याने हाच पैसा अनेकांच्या घरात खुळखुळत आहे. त्यातूनच छेडछाड, बिअरबार, ढाब्यांमधील बैठका, कॉलेजबाहेर धूम स्टाइलचा दंगा आणि व्यवहार बिनसला की हत्यांसारखे प्रकार घडत आहेत. भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सरकारी, वनजमिनी, कलेक्टर जमिनी तसेच खाजण जमिनींवर अनधिकृत बांधकामे उभारण्याचा सपाटा लावला आहे. शहरांजवळील ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी याच भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. या गैरधंद्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा हिरिरीने सहभाग असल्याने पालिका प्रशासन आणि ग्रामपंचायत व्यवस्थेतील अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या दोन वर्षांत सुमारे २० हजारांहून अधिक चाळी, इमारतींची अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. एका खोलीत चार माणसे गृहित धरली तरी ऐंशी हजार रहिवासी या अनधिकृत बांधकामांमध्ये राहत आहेत. या खोल्या भूमाफियांकडून खरेदीदाराला एका शंभर-दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून आठ ते दहा लाखांला विकल्या जात आहेत. हे खरेदीदार कोण, कुठले याची कोणतीही खातरजमा केली जात नाही. या नवीन रहिवाशांची माहिती जमीन मालकाने स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. बेकायदेशीरपणे सरकारी जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत बांधकामे उभी करणारे भूमाफिया आपले बिंग फुटू नये म्हणून अशा कायदेशीर गोष्टींचा अवलंब करण्याचे टाळतात. त्यामुळे या अनधिकृत खोल्यांचा बहुतांशी वापर गुन्हेगारांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. कल्याण डोंबिवली परिसरात खोली घ्यायची आणि मुंबईत चोरी करून पुन्हा खोलीत येऊन लपून बसायचे, असा एक नवीन धंदा सुरू झाला असल्याचे जागरूक नागरिक गजानन भाग्यवंत, राजेंद्र रहाळकर यांनी सांगितले. हा ‘इझी मनी’ कल्याण डोंबिवलीला गुन्हेगारीच्या विळख्यात घेऊन जात आहे. त्यामुळे सामान्य, मध्यमवर्गीय माणूस हैराण होत आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक म्हणून ओळखली जाणारी ही दोन्ही शहरे आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चालली आहेत. या बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधींचा हात असल्याने आयुक्त सोनवणे या बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या बांधकामांवर पाच-दहा पटीने दंड आकारला तर पालिकेला लाखोंचा महसूल मिळेल, पण ही बांधकामे पालिकेच्या दस्तऐवजात येऊच नये, अशी खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. आयुक्तांची हतबलताही या सर्व अनाचारात भर घालीत असल्याची टीका दक्ष नागरिक कौस्तुभ गोखले यांनी केली आहे.    
कारवाई सुरूच..!
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरूच आहे. पावसाळ्यामुळे त्याच्यात खंड पडला होता. आता ही कारवाई पुन्हा मोठय़ा जोमाने सुरू करण्यात येणार आहे. तसेच, प्रभाग निहाय अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू आहे. नागरिकांना अशा बांधकामांमध्ये घरे घेऊ नका म्हणून वेळोवेळी सावध करण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणात ही कारवाई हाती घेण्याचा प्रशासन विचार करीत आहे. सोमवारीच याबाबत एका बैठकीत विचार करण्यात आला.
अनिल डोंगरे, उपायुक्त, अनधिकृत बांधकाम

नव्या बांधकामांना कर आकारणी नाही
जुन्या अनधिकृत बांधकामांना दंड आकारून यापूर्वीच कर आकारणी करण्यात आली आहे. नव्या अनधिकृत बांधकामांचा सध्या तरी कर आकारणीचा विचार नाही. याबाबत उच्चपदस्थांचे काही आदेश आहेत.
तृप्ती सांडभोर, करनिर्धारक व संकलक.