डोंबिवली ते वाशी दरम्यान प्रवाशांची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या ओमनी, जीप, खासगी बस डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची सर्वाधिक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार होत असल्याने शहरात नियमितपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत असल्याची तक्रार डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष नंदू परब यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.
अनधिकृत प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक इंदिरा चौकापर्यंत आपली वाहने घेऊन येतात. वाहतूक पोलिसांसमक्ष हा प्रकार सुरू आहे. वाहतूक तपासणीची ठिकाणे सोडून वाहतूक पोलीस वेगळ्याच ठिकाणी तपासणी करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पांडुरंग विद्यालय, मंजुनाथ शाळा, जोंधळे विद्यालय, स्वामी विवेकानंद शाळा, पाटकर विद्यालय या शाळा रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावेत, अशी मागणी नंदू परब यांनी केली आहे.
वाहने ठेवण्यासाठी जागा नसताना टोचन व्हॅन चालक चालकाला कोणतीही माहिती न देता थेट वाहने उचलून नेऊन काळाबाजार करीत आहेत. अधिकृत एकच टोचन व्हॅन शहरात कार्यरत असताना दुसऱ्या टोचन व्हॅनद्वारे चालकांना लुबाडण्याचा उद्योग वाहतूक विभागाने सुरू केली असल्याची टीका परब यांनी केली आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी परब यांनी इंदिरा चौकात एक दिवसाचे उपोषण केले. वाहतूक विभागाने या मागण्यांची दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे.
काँक्रिटीकरणाच्या कामासाठी डोंबिवलीतील मानपाडा रस्ता, लोकमान्य टिळक चौक ते कल्याण रस्ता खोदण्यात आल्याने सकाळी आणि संध्याकाळी शहरात येण्याचे आणि जाण्याचे मार्ग ठप्प होत आहेत. ही वाहतूक कोंडी आटोक्यात आणणे वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दृश्य दिसत आहे.