भूखंड माफियांचा नदीवरही डोळा
सोनई (ता. नेवासे) येथील कौतुकी नदीची बेकायदेशीर विक्री करण्यात आली असून त्याची गंभीर दखल महसूल खात्याने घेतली आहे. प्रांताधिकारी सुहास मापारी हे या नदीची समक्ष पाहणी करणार असून वरिष्ठांना अहवाल देणार आहेत. नदीची मोजणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे सोनई हे गाव व कर्मभूमी आहे. गावाच्या मधून ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेली नदी कौतुकी नदी वाहते. या नदीचे वर्णन अनेक प्राचिन धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. सोनई गावात जागेचे भाव भडकले असून त्याचा फायदा काही बांधकाम व्यावसायिक व खंडणीखोरांनी घेतला आहे. राजकीय पुढाऱ्यांचे त्याला पाठबळ आहे. नदीच्या दोन्ही बाजुंवर बेकायदा अतिक्रमणे करून बांधकामे करण्यात आली. विशेष म्हणजे नदीकाठची जागा ६० लाख रुपयाला बेकायदेशीररीत्या विकण्यात आली. दोघे बांधकाम व्यावसायिक तेथे व्यापारी संकुलाचे काम करीत आहेत. ग्रामपंचायतीने त्यास हरकत घेतलेली नाही. बांधकाम करण्याची परवानगी महसूल खाते देते. त्यांचीही परवाणगी या व्यवहारास देण्यात आली नव्हती.  सामाजिक कार्यकर्ते शरद काळे यांनी काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. जिल्हाधिकारी डॉ. संजिवकुमार दयाल यांच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. डॉ. दयाल यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेवाशाचे तहसीलदार उजागरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते. राजकीय दबावाखाली चौकशी होत नव्हती. पण आता वरिष्ठ पातळीवरून काही पर्यावरणवाद्यांनी तक्रारी केल्या. केंद्र व राज्य सरकारकडे अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही राजकीय नेत्यांनीही आता त्यात लक्ष घातले आहे. त्यामुळे महसूल खाते सजग झाले आहे. कौतुकी नदीची मोजणी केली जाणार असून तशी कारवाई करण्याचे तातडीचे आदेश तहसीलदार उजागरे यांना देण्यात आलेले आहेत. प्रांताधिकारी मापारी हे स्वत: बेकायदा बांधकामांची चौकशी करणार आहेत.