जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर एका अशिक्षित शेतकऱ्याच्या शिक्षकपुत्राने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिक्षणाधिकारी सरळसेवा परीक्षेत खुल्या गटात आठवे स्थान मिळविले आहे. राजेश क्षीरसागर असे त्याचे नाव आहे. हा गुणवंत तरुण माळशिरस तालुक्यातील माळीनगरचा रहिवासी आहे.
गेल्या २०१० वर्षांत शिक्षणाधिकारी व तत्सम एकूण ७४ पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात दिली होती. २०११ मध्ये लेखी चाळणी परीक्षा व वर्षांपूर्वी मुलाखती झाल्या. मात्र या परीक्षेच्या संदर्भात विविध न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमुळे परीक्षेचा निकाल भलताच लांबला होता. परंतु अखेर या परीक्षेचा निकाल एकदाचा लागला. यात ७१ पदांचा निकाल जाहीर झाला असून तीन पदांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी सरळसेवा परीक्षेच्या संदर्भात लोकसत्ताने चालविलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निकाल घोषित करावा लागला.
राजेश क्षीरसागर हे पदव्युत्तर असून शिक्षणशास्त्रात ते २००९ मध्ये सेट परीक्षा उत्तीण झाले आहेत. शिवाय त्यांनी वृत्तपत्रविद्या पदवीही संपादन केली आहे. माळशिरस तालुक्यातील माळीनगरच्या मॉडेल विविधांगी प्रशालेत सहशिक्षकपदावर ते कार्यरत आहेत. यापूर्वी घेण्यात आलेल्या उपशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील अधिव्याख्यातापदासाठीही ते लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरले होते. परंतु त्यांची या पदांसाठी निवड झाली नव्हती. त्यांनी चिकाटी व संयम न सोडता शिक्षणाधिकारीपदाच्या परीक्षेची तयारी केली. परीक्षा देऊनही निकाल लांबणीवर पडल्याने तसेच राज्य शासनाने उपशिक्षणाधिकाऱ्यांना बढतीवर शिक्षणाधिकारीपदावर नियुक्तया दिल्याने क्षीरसागर यांची कसोटी ठरली. परंतु अखेर त्यांची प्रतीक्षा संपली. त्यांना डॉ. पांडुरंग राऊत (आयएएस-२००७, लातूर) व दक्षिण मुंबईच्या तत्कालीन शिक्षण निरीक्षक व विद्यमान पुणे विभागीय शिक्षण उपसंचालिका सुमन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.