शहरातील डॉक्टर, व्यापारी व खासगी कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना क्रेडिट कार्ड खर्चाची मर्यादा वाढवून देतो, असे सांगून कार्ड घेऊन लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या उच्चशिक्षित दोन भामटय़ांना सायबर क्राइम व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी इंदूर येथून अटक केली. मोहम्मद आशू मोहम्मद इकबाल व शबाजखान अन्वरखान अशी या आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी अभियंता आहे.
तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेकांना फसविणाऱ्या मोहम्मद आशू व शबाजखान हे दोघे शहरातील डॉक्टरांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करायचे. आयसीआयसीआय बँकेतून बोलतो आहे, तुमच्या क्रेडिट कार्ड खर्चाची मर्यादा वाढवून देतो, असे ते सांगत. बँकेकडून येणाऱ्या व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड, फोटो व पॅनकार्डची झेरॉक्स द्या, अशी कागदपत्रे मागत. इतर कागदपत्रांबरोबर क्रेडिट कार्ड घेतल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसे. खोटे बोलून मिळविलेल्या क्रेडिट कार्डच्या आधारे मोहम्मद आशू व शबाजखान यांनी लाखो रुपयांची खरेदी केली. न केलेल्या खरेदीचे पैसे अनेकांना भरावे लागल्याने या विषयीच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. बहुतांश खरेदी मध्य प्रदेशातील इंदूर या शहरात होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर सायबर क्राइम विभागाचे एक पथक इंदूरला पाठविण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील यांनी प्रकरणांचा तपास केला. शबाजखान हा २४ वर्षांचा आरोपी अभियंता असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघा आरोपींना अटक करण्यात आली.