निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी ठाणे पोलिसांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, मुंब्रा-कळवा भागांत नाक्यानाक्यांवर नाकाबंदी केली असून ढाबे, हॉटेल या ठिकाणी जागता पहारा ठेवला आहे. कल्याण ग्रामीण भागात विशेषत शीळफाटा मार्गावर असलेल्या लॉजची तपासणी केली जात असून निवडणुकीत गुंडांचा वावर वाढण्याची शक्यता घेऊन पनवेलपासून शीळ मार्गावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाक्यानाक्यांवर वाढविण्यात आलेल्या कडक पोलीस बंदोबस्तामुळे झोपडय़ांमध्ये पैशाचा दौलतजादा करू पहाणारे काही झोपडीदादा अडचणीत सापडले असून त्यांच्याशी मुसक्या बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून पेट्रोल पंपांवर बाटली, ड्रममधून पेट्रोल देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून पेट्रोल पंपांवर निवडणूक आयोगाचा एक आदेश लावून ठेवला आहे. बाटलीमध्ये पेट्रोल देण्याचा प्रकार घडल्यास संबंधित पंप चालकावर गुन्हा दाखल केला जाईल, असे फर्मान काढण्यात आले आहे. निवडणूक काळात कल्याण परिसरातील म्हारळ, वरप तसेच डोंबिवलीजवळील दिवा, भिवंडी, वसई परिसरांतील काही गावांमधून गावठी दारू कल्याण डोंबिवली भागात आणण्यात येते. पायवाटेने दारू घेऊन येणाऱ्या या वाहकांच्या मार्गावर पोलिसांनी गस्त बसवल्याने दारूचे शहरात येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. दारू दुकानातून रेडीमेड खोके विकत घेऊन झोपडपट्टीत वाटायचे तर या दुकान मालकांना खोके कोणाला विकले, ते खरेदीदाराने कोठे संपवले याची चौकशी पोलीस किंवा निवडणूक भरारी पथकाने सुरू केली आहे. त्यामुळे दुकान मालक अशी विक्री करताना सावध भूमिका घेताना दिसत आहेत.