जिल्हय़ातील १५ विधानसभा मतदारसंघात १७३ उमेदवार रिंगणात असून काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती होत असल्याने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामध्ये दोन माजी मंत्री, १२ विद्यमान आमदार तसेच ८ माजी आमदारांचाही समावेश आहे. जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनी व समाजमाध्यमांद्वारे छुपा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित केले. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत सर्वाचे प्रयत्न सुरू आहेत. मतदानाच्या दिवशी आपल्या हक्काचे अधिकाधिक मतदान करवून घेण्यावर प्रत्येकाचा कल राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे उमेदवारांची संख्या चांगलीच विस्तारली. त्यात, काही ठिकाणी तिकीट न मिळालेल्या नाराजांनी अपक्ष उमेदवारी करीत राजकीय पक्षांची चिंता वाढविली. सलग दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचारांच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व समाजमाध्यमांद्वारे छुप्या प्रचाराची प्रक्रिया कायम ठेवली. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे बहुतांश ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत. येवल्यातील लढत ही त्यापैकीच एक. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे संभाजी पवार यांच्यात काटय़ाची टक्कर आहे. शेजारील नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुत्र तथा विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांना काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर आणि शिवसेनेच्या उमेदवाराशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. सिन्नर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार माणिक कोकाटे यांच्यासमोर शिवसेनेचे राजाभाऊ वाजे, इगतपुरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आ. निर्मला गावित यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार शिवराम झोले व भाजपचे चंद्रकांत खाडे यांचे आव्हान आहे. शहरातील मतदारसंघांत तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेचे आ. वसंत गीते, शिवसेनेचे उमेदवार अजय बोरस्ते, भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे व काँग्रेसचे शाहू खैरे यांच्यात लढत होत आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात मनसेचे आ. नितीन भोसले, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, काँग्रेसचे दशरथ पाटील, भाजपच्या सीमा हिरे यांच्यात अटीतटीची लढाई होत आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब सानप, राष्ट्रवादीचे देविदास िपगळे, काँग्रेसचे उद्धव निमसे यांच्यात लढत होत आहे. देवळाली मतदारसंघात भाजपचे रामदास सदाफुले व रिपाइंचे प्रकाश लोंढे परस्परांसमोर शड्डू ठोकून आहेत. या मतदारसंघात शिवसेनेतर्फे मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे बबन घोलप यांचे पुत्र योगेश, राष्ट्रवादीचे नितीन मोहिते यांच्यात लढत आहे.
कळवण मतदारसंघाचे प्रदीर्घ काळापासून प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री ए. टी. पवार, माकपचे जिवा पांडू गावित व भाजपचे यशवंत गवळी यांच्यात कडवी झुंज आहे. दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेचे आ. धनराज महाले, काँग्रेसचे रामदास चारोस्कर, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्यात तर निफाड मतदारसंघात शिवसेनेचे आ. अनिल कदम, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्यात अस्तित्वाची लढाई होत आहे. चांदवड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आ. शिरीषकुमार कोतवाल यांच्यासमोर भाजपचे डॉ. राहुल आहेर यांचे आव्हान आहे. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपचे उमेदवार असल्याने वेगळीच चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या िरगणात उतरलेल्या १७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान प्रक्रियेतून मतदार निश्चित करणार आहेत.