चारित्र्याचा संशय घेऊन आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला व शेजारच्या कुटुंबातील तिघाजणांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केल्याबद्दल करमाळ्यातील एका तरुणाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
इरफान लालाभाई शिकलकर (वय ३१, रा. सुतार गल्ली, करमाळा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषी आरोपीचे नाव आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. कोल्हे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. या खटल्याची पाश्र्वभूमी अशी की, आरोपी इरफान शिकलकर हा आपली पत्नी नसरीन (वय २६) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नेहमी मारहाण करीत असे. याच कारणावरून १३ एप्रिल २०१२ रोजी इरफान याने पत्नी नसरीन हिच्यावर चाकू उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता जीव वाचविण्यासाठी नसरीन घराबाहेर पळाली व शेजारच्या पितांबर चुंग यांच्या घरात जाऊन आश्रय घेतला. परंतु इरफान तिचा पाठलाग करीत चुंग यांच्या घरात घुसून पत्नीवर हल्ला करू लागला. तेव्हा त्यास चुंग कुटुंबीयातील जया पितांबर चुंग (वय ३८) यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता रागाने बेभान झालेल्या इरफान याने जया चुंग यांच्यासह किरण पितांबर चुंग (वय २१) व संदीप प्रदीपकुमार चुंग (वय २४) या तिघाजणांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक चुंग यांच्या घराभोवती जमा झाले असता इरफान याने चाकूचा धाक दाखवत दरडावले.
दरम्यान, पत्नी नसरीन ही जीवाच्या आकांताने चुंग यांच्या घरातून पळत पुन्हा स्वत:च्या घराकडे गेली. तेव्हा इरफान हा देखील पाठोपाठ घरी गेला. नंतर त्याने नसरीन हिच्या गळ्यावर पाय ठेऊन चाकूने भोसकले. यात ती जागीच मरण पावली. यासंदर्भात प्रदीपकुमार चुंग यांनी करमाळा पोलीस ठाण्यात इरफान याच्याविरूध्द फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला. या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी दहा साक्षीदार तपासले. यात जखमी साक्षीदारांचा पुरावा महत्त्वाचा ठरला. आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. अजित कट्टे यांनी काम पाहिले.