महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचा येथील सहायक लेखाधिकारी दयाराम चव्हाण याला एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश एम. जी. शेवलीकर यांनी गुरुवारी ही शिक्षा सुनावली.
मानवत तालुक्यातील ईटाली येथील हिरामण ज्ञानोबा धबडगे यांनी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळात शेळीपालन प्रस्ताव दाखल केला होता. महामंडळाकडून धबडगे यांना दहा हजार रुपये अनुदान मंजूर झाले. अनुदानाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी सहायक लेखाधिकारी चव्हाण याने एक हजार रुपये लाच मागितली. चव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १९ ऑक्टोबर २०१० रोजी लाचलुचपत विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक पी. बी. भोसले व पोलीस अधीक्षक विजय डोंगरे यांनी सापळा रचून लाच घेताना चव्हाणला रंगेहाथ पकडले. चव्हाणविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अॅड. सुभाषराव देशमुख हट्टेकर यांनी काम पाहिले.