चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवून देणाऱ्या शिवाजी मारुती पाटील (वय ३०, रा. हादनाळ, ता.चिक्कोडी, जि.बेळगाव) या भारतीय दंडविधान कलम ४९८ व ३०२ अन्वये जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती पी. डी. देसाई यांनी आरोपीस जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.    
मयत वंदना शिवाजी पाटील व आरोपी शिवाजी मारुती पाटील यांचा २६ जून १९९९ साली विवाह झाला होता.
विवाहानंतर थोडे दिवस सासरी तिला व्यवस्थित नांदविले. आरोपी हा टँकरवर ड्रायव्हर म्हणून काम करत असून त्यास दारूचे व्यसन होते. लग्न झाल्यानंतर वंदना व शिवाजी हे दोघे कणेरी येथे भाडय़ाने घेतलेल्या खोलीत राहात होते. शिवाजी हा नेहमी वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत असे. २४ फेब्रुवारी २००८ रोजी सायंकाळी शिवाजी हा दारू पिऊन वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला. घरातील बाटलीमधील रॉकेल घेऊन त्याने वंदनाच्या अंगावर ओतून तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत वंदना हिला छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण औषधोपचार सुरू असताना तिचा २९ फेब्रुवारी २००८ रोजी मृत्यू झाला.    
सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मयताने दिलेली फिर्याद हा मृत्युपूर्व जबाब होतो व विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर वंदनाने दिलेला मृत्युपूर्व जबाब हा विश्वसनिय मानला जावा व इतर साक्षीदारांना मयताने आपल्यास नवऱ्याने जाळून मारले आहे हा सर्व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य़ मानावा, असा केलेला युक्तिवाद न्यायालयाने स्वीकारून आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली.