दारू पिण्यासाठी पसे देण्यास नकार देणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती पंडित हरिभाऊ राठोड यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण तांडा येथील पंडित हरिभाऊ राठोड यास दारूचे व्यसन होते. त्यातूनच तो पत्नी विजयमाला हिला मारहाण करीत होता. २१ मार्च २०१२ या दिवशी मध्यरात्री पंडित याने विजयमालाकडे दारूसाठी पसे मागितले. परंतु तिने पसे दिले नाही. त्यामुळे पंडित याने तिच्या पोटात विळा मारून खून केला. खुनानंतर पंडित पळून गेला. पहाटे गावातील लोकांनी त्यास पकडून पाथरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
विजयमालाचे चुलते रंगनाथ दासू जाधव यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ आवाड यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सरकारी वकील ए. के. दुर्राणी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जी. शेवलीकर यांनी आरोपी पंडित यास जन्मठेप व शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.