शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या घरी मृत्यूमुखी पडलेल्या विनोद कोंडस्कर यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी, तसेच गावंडे यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने स्थानिक गांधी चौकात भीक मांगो आंदोलन केले. यावेळी नाभिक समाजाच्या बांधवांनी गावंडे यांचा निषेध नोंदवित कोंडस्कर कुटुंबीयांना न्याय  देण्याची विनंती काँग्रेस नेत्यांना केली.
 शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या बायपासवरील घरात विनोद कोंडस्कर या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला, मात्र आता गावंडे यांनी हे घर आपले नाही, असा घुमजाव करून या आंदोलनाला पक्षीय आंदोलनाचा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात या आंदोलनाला कुणाचीही फूस नाही. उलट, गावंडे यांनीच गावगुंडांच्या माध्यमातून कोंडस्कर कुटुंबीयांना धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत. त्याचा निषेध व कोंडस्कर कुटुंबाच्या मदतीसाठी अलीकडेच गांधी चौकात भीक मागो आंदोलन करण्यात आले. यावेळी नाभिक समाजाच्या बांधवांनी भीक मागून पैसे गोळा केले, तसेच गावंडे यांच्या नावाचा जोरदार निषेध करण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याऐवजी गावंडे यांनी गावगुंड व काही नगरसेवकांच्या माध्यमातून कोंडस्कर यांच्या विधवा पत्नी व वृध्द आईला धमकावणे व दबाव टाकण्याचे प्रकार सुरू केले आहेत. त्यामुळे कोंडस्कर कुटुंबीय पुरते घाबरले आहे.
गावंडे यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी जटपुरा गेट येथे मुंडन करून एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी गावंडे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु नाभिक समाज कोंडस्कर यांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहिला. यावेळी गावंडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
 यावेळी नाभिक बांधवांनी कोंडस्कर यांच्या मृत्यूचा उत्तरीय तपासणीचा खरा अहवाल देण्यात यावा, ठाणेदार चिंचालकर यांनी गावंडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख आर्थिक मदत, पत्नीला नोकरी द्यावी, एमएससीबीचा अहवाल त्वरीत द्यावा, नुकसान भरपाई द्यावी, तसेच गावंडे यांना अटक करण्याची मागणीही लावून धरण्यात आली. यावेळी भिक मागो आंदोलन करणाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात स्वत:ला अटक करून घेतली. दरम्यान, मदत दिली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नाभिक समाजाने पत्रकार परिषदेत दिला. गावंडे यांनी प्रसिध्द पत्रकातून हे घर त्यांचे नसल्याचा दावा केला असला तरी हे घर त्यांचेच असून त्याचे शंभर पुरावे देण्याची तयारी आहे. गावंडे यांनी त्याला तयार राहावे, असा इशारा दिला. गावंडे यांचा खरा चेहरा समाजासमोर उघडकीस आणू, असेही संतप्त कार्यकर्ते म्हणाले. कोंडस्कर कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोवर आंदोलन वेगवेगळ्या पध्दतीने सुरूच राहील. प्रसंगी अधिक तीव्र करण्याचा इशाराही समाजबांधवांनी दिला. पत्रपरिषदेला नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्याम राजुरकर, कार्याध्यक्ष दिनेश एकवनकर, नाभिक संघाचे अध्यक्ष रवी येसेकर, सलून असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पिजदूरकर, रवी हनुमंते, विजय कोंडस्कर, दीपक नक्षणे, संतोष अतकरे उपस्थित होते.