लातूर महापालिकेने सोयाबीनला ३ टक्के एलबीटी कर लावण्याच्या कारणावरून आंतरराष्ट्रीय टीना ऑइल मिल कंपनीने लातूर एमआयडीसी प्लँटवरील सोयाबीनची खरेदी बंद केली. तसा अधिकृत फलकच कंपनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.
एलबीटी आकारणीबाबत लातुरात प्रारंभापासून व्यापारी महासंघाने तीव्र विरोधाची भूमिका घेतली. मात्र, सरकारनेही आपली भूमिका बदलली नाही. सोयाबीन खरेदीवर ३ टक्के एलबीटी कर आकारला, तर आपल्याला कंपनी बंद करावी लागेल, असे टीनाने राज्य सरकार व महापालिकेकडे लेखी कळविले होते. दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारचे उत्तर टीनास प्राप्त झाले नाही.
एका क्विंटलला किमान १०० रुपये एलबीटी कर द्यावा लागला तर राज्यातील अन्य शहरांपेक्षा किमान १०० रुपये शेतकऱ्याला कमी द्यावे लागतील. हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असल्यामुळे टीनाने खरेदी करणेच बंद केले. ही खरेदी बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे एक हजार टन क्षमता असलेली ही कंपनी बंद होईल. त्यामुळे चारशेजणांच्या थेट रोजगारावर कुऱ्हाड बसणार आहे, तर या कंपनीवर आधारित सुमारे पाच हजार जणांना फटका बसणार आहे.
सन १९९७ मध्ये लातूरमध्ये टीनाने ऑइल मिल सुरू केली, तेव्हा १०० हेक्टरवरही सोयाबीनचे उत्पादन घेतले जात नव्हते.
टीनाने राज्यातील अन्य जिल्ह्य़ांतून सोयाबीन खरेदी करून कारखाना चालवला. जिल्हा व परिसरावरील शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीचे महत्त्व सांगितले. त्यातून आजमितीस राज्यात लातूरचे सोयाबीन उत्पादन पहिल्या क्रमांकावर आहे, तर देशात जिल्ह्य़ाचा तिसरा क्रमांक आहे. सोयाबीन लागवडीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टीना या बहुराष्ट्रीय कंपनीस महापालिकेच्या एलबीटीमुळे आपला व्यवसायच बंद करण्याची वेळ आली आहे.
महापालिकेने एलबीटीसंबंधी निर्णय बदलला तर पुन्हा खरेदी सुरू केली जाईल, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे. महापालिकेचे अधिकारी मात्र या बाबत बोलायला तयार नाहीत.