दिवंगत यशवंतराव चव्हाण मुळात संस्कारित व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मोफत शिक्षण सुरू केले नसते तर कदाचित बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला असता. चव्हाण यांना सामाजिक, राजकीय, शिक्षण, साहित्य, शेती व संस्कृती अशा प्रत्येक विषयात आवड होती. त्यामुळे महाराष्ट्र आज प्रगतीच्या दिशेने जात आहे. चव्हाण यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या नावाने शिस्तबद्धतेत पार पडणारा अंबाजोगाईतील हा एकमेव स्मृती समारंभ असल्याचे मत प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.
अंबाजोगाई शहरात भगवानराव लोमटे यांनी सुरू केलेल्या २७व्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारंभाचे उद्घाटन कवी विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितीत झाले. ज्येष्ठ संपादक शरद कारखानीस, गिरधारीलाल भराडिया व दगडू लोमटे उपस्थित होते.
विठ्ठल वाघ म्हणाले की, राजकारणात काम करणारा पुढारी असो की मंत्री वा मुख्यमंत्री; प्रत्येकाचे कर्तृत्व एका विशेष गोष्टीमुळे असते. मात्र, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व सर्वस्पर्शी होते. सुसंस्कृत, साधेपणा व झोपडीतील माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, हे त्यांचे वेगळेपण होते. चांगुलपणा हा राजकीय नेतृत्वाला सत्तेच्या खुर्चीपासून थांबवू शकतो. मात्र, यशवंतरावांनी चांगुलपणावर सत्ता टिकवली. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. खेडय़ा-पाडय़ात शिक्षण पोहोचले पाहिजे. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. औद्योगिकीकरण झाले तरच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होईल हे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यामुळे खेडय़ा-पाडय़ापर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे बहुजन समाज सुशिक्षित झाला.
शरद कारखानीस यांनी यशवंतरावांच्या जीवनाचे विविध पैलू सांगताना, आदर्श नीतिमूल्यांची त्यांची शिकवण वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन प्रा. मेघराज पौळ यांनी केले. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी कवी संमेलन रंगले. यात राज्यभरातील कवींनी सहभाग नोंदवला.     
दुसऱ्या पिढीतही परंपरा
जि. प.चे माजी अध्यक्ष भगवानराव लोमटे राजकारणात असूनही साहित्य व संस्कृती क्षेत्राची जाण असलेले नेतृत्व होते. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने २७ वर्षांपूर्वी लोमटे यांनी अंबाजोगाई शहरात यशवंतराव स्मृती समारंभ सुरू केला. दरवर्षी होणाऱ्या या समारंभाने अंबाजोगाईला वेगळी ओळख मिळवून दिली. दोन महिन्यांपूर्वी लोमटे यांचे निधन झाले. या वर्षी समारंभाचे नियोजन लोमटे यांचे चिरंजीव माजी जि. प. सदस्य राजपाल यांनी केले. वडिलांच्या सांस्कृतिक व साहित्याची परंपरा त्यांची पुढची पिढी आता चालवत आहे.