बिबवेवाडी परिसरात भरदुपारी केबल व्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी सातजणांस जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ९ जून २०१० रोजी अप्पर इंदिरानगर येथे ही घटना घडली होती.
संतोष शिवाजी राशीनकर (वय ३१, रा. भाग्यनगरी, बिबवेवाडी), राजेश आगलेश रमन (वय ३४, रा. सुखसागरनगर), रुपेश किसन खोपडे (वय २०, रा. मल्हारी मरतड सोसायटी, सहकारनगर), दत्ता सिद्धराम कांबळे (वय २५), संजय सिद्धराम कांबळे (वय ३०, रा. दोघेही- अप्पर इंदिरानगर), शेखर विलास मळेकर (वय २३, रा. बालाजीनगर), दयानंद गोपीनाथ शिंदे (वय २५, रा. अप्पर इंदिरानगर) अशी जन्मठेप सुनावलेल्यांची नावे आहेत. या घटनेत सुरेश ऊर्फ मामा मारुती वाघमारे (वय ४०, रा. अप्पर इंदिरानगर) या केबल व्यावसायिकाचा खून झाला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील निलीमा वर्तक यांनी काम पाहिले.
वर्तक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे यांचा जय तुळजाभवानी केबल नेटवर्कचा व्यावसाय बिबवेवाडी येथे होता. केबल व्यवसायाच्या वादातून २००७ मध्ये वाघमारे यांच्यावर हल्ला झाला होता. यामधून ते बचावले होते. त्यानंतर त्यांना काही व्यक्तींनी पळवून नेत त्यांच्या काही कागदांवर सह्य़ा घेतल्या होत्या. त्यांनी केबलनेटवर्कचा व्यवसाय विकत असल्याचे त्या कागदावर लिहिले होते. त्यांना सोडून दिल्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व करमणूक कर विभागाकडे केबल व्यवसाय विकल्याचे आपल्याकडून जबरदस्तीने सह्य़ा घेतल्याचा अर्ज दिला होता. त्याच बरोबर सहकारनगर पोलीस ठाणे व पोलीस आयुक्तालयांकडे अर्ज केला होता. घटनेच्या काही दिवस पत्रकार परिषद घेऊन वाघमारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते.
९ जून २०१० रोजी वाघमारे यांना दुपारी केबल दुरुस्तीसाठी एक फोन आला. त्यांना स्वामी समर्थनगर या ठिकाणी बोलावण्यात आले. पण त्याठिकाणी त्यांना कोणीच न भेटल्यामुळे ते आपला भाऊ अमोलसह घरी परत येत होते. त्यावेळी मोटारीतून पाच व दुचाकीवर दोघे अशा सातजणांनी वाघमारे यांना पोकळे वस्ती येथे अडविले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांचा खून केला. त्यांच्या सोबत असणाऱ्या भावाने फोन करून मोठय़ा भावास घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पण तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर वाघमारे यांच्यावर एकूण ३४ वार झाले होते. आरोपींपैकी राशीनकर व रमन यांनी वाघमारे यांचा केबल व्यवसाय विकत घेतला असून तो हस्तांरणासाठी अर्ज केला होता. हा पुरावा ग्राह्य़ धरला. सरकारी पक्षाकडून एकूण २९ साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यातील आरोपी राशीनकर याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तो ससून रुग्णालयातून पळाला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला यावर्षी अटक केली आहे.