मुळा धरणातून जायकवाडी धरणासाठी आज पहाटे ६ वाजता पाणी सोडण्यात आले. २५० क्युसेक्स वेगाने सोडलेले हे पाणी व्हाया देव नदी मुळा नदीत जाणार असून, कमी वेगामुळे राहुरी तालुक्याच्या पुढे जाण्यासच त्याला दोन दिवस लागतील.
उच्च न्यायालयाच्या ४८ तासांत मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडा या आदेशाची मुदत आज दुपारी १२ वाजता संपणार होती. त्यामुळे आदेशाचा अवमान नको व पूर्णक्षमतेने, वेगात पाणी सोडायलाही नको या विचारातून फक्त २५० क्युसेक्स वेगाने आज पहाटे ६ वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले. कमी वेगामुळे ते धरणाच्या दरवाजातून सोडता येणे शक्य नव्हते.
धरणाच्या डाव्या कालव्यातून जाणारे हे पाणी आज सुरुवातीला देव नदीत व नंतर मुळा नदीत येऊन पुढे जाईल. या प्रवासासाठीच पाण्याला दोन दिवस लागतील असे सांगण्यात येत आहे. पाटबंधारे खात्याचे अधिकारी याविषयी काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे किती पाणी सोडणार, किती वेळ सोडणार, याचा काहीही तपशील अधिकृतपणे मिळू शकला नाही. पाणी सोडण्याचा वेग कमी असला तरी मुळातच धरणातील पाणीसाठा मर्यादित असल्याने पातळी झपाटय़ाने कमी होणार असून त्यानंतर धरणात फक्त अचल साठाच शिल्लक राहणार आहे.
पाटबंधारे विभाग पाणी सोडण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जिल्हय़ात आता यामुळे बराच असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. नगर महापालिकेसह जिल्हय़ातील सर्वानीच धरणातून पाणी सोडण्याला विरोध होता. धरणातील पाण्याची पातळी १ हजार ७५० फुटांपेक्षा खाली गेली तर नगर शहर पाणीपुरवठा बंद पडून सगळय़ा शहराला पाणीटंचाई सहन करावी लागणार आहे. त्याचबरोबर या पाणी योजनेवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायती, औद्योगिक वसाहती, लष्करी वसाहती यांचीही मोठी अडचण होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 1:08 am