News Flash

देशात उच्च रक्तदाबाचे प्रमाण सहा टक्के

देशात रक्तदाबाचे प्रमाण सहा टक्के असून त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये हे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये महिलांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनाने स्पष्ट झाले आहे.

| May 14, 2014 08:12 am

देशात रक्तदाबाचे प्रमाण सहा टक्के असून त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये हे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये महिलांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनाने स्पष्ट झाले आहे. उच्च रक्तदाब होऊ नये, यासाठी योग्य आहार घ्यावा, धुम्रपान करू नये, शारीरिक श्रम व व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हृदयाच्या आकुंचन व प्रसारणामुळे रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व इंद्रियांना रक्त पुरवले जाते. ज्या दाबाखाली ते रक्तवाहिन्यांमधून वाहते त्याला रक्तदाब असे म्हणतात. हृदय आकुंचन पावलेले असताना जो रक्तदाब असतो, त्याला ‘सिस्टॉलिक ब्लड प्रेशर’ असे म्हणतात. हृदय शिथिल झालेले असताना रक्तदाबाला ‘डायस्टॉलिक ब्लड प्रेशर’ असे म्हणतात. निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये सिस्टॉलिक रक्तदाब ८० इतका असतो. काही विकसित देशांमध्ये २५ टक्के प्रौढांचा डायस्टॉलिक रक्तदाब ९० पेक्षा जास्त आहे. विकसनशील देशाम्ांध्ये हे प्रमाण १० ते २० टक्के आढळून येते. डोंगराळ भागात राहणाऱ्या तसेच काही अदिवासी समाजामध्ये फारच कमी रक्तदाब असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा आजार माहीत असलेल्या रुग्णांपैकी फक्त निम्म्याच लोकांना उपचार मिळत असतात. शालेय विद्यार्थ्यांचा रक्तदाब तपासून त्यापैकी कोणाला भविष्यात उच्च रक्तदाब होणार आहे, याचा अंदाज आधीच बांधता येतो. ज्या मुलांचा रक्तदाब वयाच्या मानाने सामान्य परंतु इतर सर्वसाधारण मुलांपेक्षा जास्त असतो, त्या मुलांना भविष्यात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून शालेय आरोग्य तपासणीत मुलांचा रक्तदाबही मोजायला हवा. म्हणजे अशा मुलांना लहान वयातच योग्य सल्ला मिळून भविष्यात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता कमी होईल, असे मत असोसिएशन ऑफ फिजिशियन, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय काटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
वाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीचा रक्तदाब वाढतो. पौगंडावस्थेपर्यंत मुला-मुलींचा रक्तदाबात फारसा फरक नसतो. हा फरक वयाच्या ४० वर्षांंपर्यंत तसाच राहतो व नंतर परत नाहीसा होतो. उच्च रक्तदाब हा कमी प्रमाणात अनुवंशिक घटकांवरही अवलंबून असतो. लठ्ठपणा, दिवसाला ७ ते ८ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे, स्निग्ध पदार्थाचा आहारात जास्त प्रमाणात समावेश, अतिप्रमाणात मद्यपान, शारीरिक श्रमाचा अभाव, ताणतणाव, निम्न आर्थिक स्तर यामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता बळावते.
छातीत दुखणे, डोके दुखणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, हातापायाला मुंग्या येणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, मूच्र्छा येणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु पुष्कळ व्यक्तींमध्ये या आजाराने गंभीर स्वरूप धारण करेपर्यंत कोणतेही लक्षण दिसून येत नाही. लक्षात येते तेव्हा मूत्रपिंड, डोळे या नाजूक इंद्रियावर कायमस्वरुपी दुष्परिणाम झालेले असतात व ते मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच या आजाराला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जात असल्याचे डॉ. काटे यांनी सांगितले.
या आजारावर नियंत्रण व प्रतिबंध करणे तसे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका व मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यासाठी आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे, स्निग्ध पदार्थाचे सेवन कमी करणे, मद्यपान टाळणे, तसेच अतिरिक्त आहार न घेणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. वजन कमी करणे, शारीरिक श्रम करणे, व्यायाम करणे, ताणतणाव कमी करणे, धूम्रपाण न करणे, याबरोबरच आरोग्य शिक्षणाने उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच प्रतिबंध करता येईल, अशी अपेक्षाही डॉ. काटे यांनी व्यक्त केली.
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी. उच्च रक्तदाबाची औषधे सामान्यत आयुष्यभरासाठी घ्यावी लागतात. त्यामुळे कंटाळा न करता नियमित औषधे घ्यावीत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याखेरीज अशा रुग्णांनी मनाने किंवा इतरांच्या सल्ल्याने औषधोपचारामध्ये कोणतेही बदल करू नये. वयाच्या चाळिशीनंतर नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करावी, असा सल्लाही त्यांनी यानिमित्त दिला. उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देऊन त्यांना रक्तदाबाची मोजणी नियमितपणे करण्यासाठी प्रवृत्त करावे, या उद्देशाने जागतिक उच्च रक्तदाब संघटना १४ मे २००५ पासून ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन’ साजरा करीत असते. असे असताना संपूर्ण जगातच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनाही चिंता व्यक्त करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2014 8:12 am

Web Title: in india percentage of high blood pressure is 6
Next Stories
1 नागपूर जिल्हा सहकारी बँकेला १३९ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्य
2 नागपुरातून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ा फुल्ल
3 माफियांविरुद्ध कारवाईनंतरही जिल्ह्य़ात वाळूचे अवैध उत्खनन
Just Now!
X