मराठी रंगभूमीवर विनोदी अभिनयात आपली स्वत:ची शैली निर्माण करणाऱ्या आणि गेली तब्बल ३० वर्षे लोकांना एकहाती हसवणाऱ्या प्रशांत दामले यांच्या नावावर आता आणखी एक विश्वविक्रम जमा होणार आहे. नव्या वर्षांतील पहिल्याच शनिवारी प्रशांत आपल्या ‘गेला माधव कुणीकडे’ या चिरतरुण नाटकाचा १७४६ वा प्रयोग करणार आहेत. हा त्यांच्या कारकीर्दीतील १०,७०० वा प्रयोग असेल. या प्रयोगानंतर जागतिक रंगभूमीवर सर्वाधिक प्रयोग करणारा कलावंत म्हणून प्रशांत दामले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट होणार आहे.
पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘टुरटुर’ या नाटकातील एक बंगाली मुलगा म्हणून १९८३ साली रंगभूमीवर पदार्पण केलेल्या प्रशांत दामले यांनी अल्पावधीतच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘एक गाणारा अभिनेता’ म्हणूनही त्यांनी ख्याती मिळवली. त्यानंतर ‘मोरूची मावशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘शूऽऽ कुठं बोलायचं नाही’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एका लग्नाची गोष्ट’ अशा एकापेक्षा एक मनोरंजक नाटकांतून त्यांनी प्रेक्षकांचे मन रिझवले आहे.
आतापर्यंत जागतिक रंगभूमीवर १० हजारांपेक्षा जास्त प्रयोग करण्याचा बहुमान केवळ एका जपानी कलाकाराच्या नावावर जमा होता. मात्र प्रशांत दामले आता हा विक्रम मोडून काढत सर्वात जास्त प्रयोगांचा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहेत. दामले यांच्या नावावर आतापर्यंत एका दिवसात तीन वेगवेगळ्या नाटकांचे पाच प्रयोग, एका वर्षांत ४६९ प्रयोग, असे अनेक विक्रम जमा आहेत. आता त्यात आणखी एका विक्रमाची भर पडणार आहे.
विश्वविक्रमाच्या वाटेने जाणाऱ्या प्रशांत दामले यांच्यावर एकसुरी, गल्लाभरू नाटके करण्याचे आक्षेपही अनेकांनी घेतले आहेत. मात्र नाटक हे लोकांसाठी असते, आणि लोकांना आवडेल तसेच नाटक करणे यात काहीच चूक नाही, असे उत्तर दामले यांनी दिले. आता ५ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रशांत दामले आपल्या ‘गेला माधव कुणीकडे’ या प्रयोगाचा १७४६ वा प्रयोग आणि त्याच वेळी आपल्या कारकीर्दीतला १०,७०० वा प्रयोग सादर करतील. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे.