आईवडीलांच्या नावाने पुरस्कार देण्याच्या प्रवृत्तीला उधाण आले असतांना कवी अनंत फंदी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा अन्य पुरस्कारापेक्षा वेगळा पुरस्कार आहे. पुरस्कारार्थीसाठी तो भूषणावह असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बी. जे. खताळ यांनी केले.
संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने कवी अनंत फंदी पुरस्काराचे वितरण माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत प्रा. सोपानराव देशमुख, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जसपाल डंग, इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी यांच्यासह पुरस्कारप्राप्त साहित्यिक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खताळ म्हणाले, देशासमोर आज अनेक ज्वलंत प्रश्न उभे आहेत. या ज्वलंत प्रश्नांची चर्चा होतांना दिसत नाही. मात्र पुरस्कारांचे उधाण आले आहे. वर्तमानपत्रातील जागाही देशापुढील प्रश्नाऐवजी अशा विषयांना दिल्याचे दिसते. कवी अनंत फंदी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी फंदीच्या नावाने पुरस्कार दिला जावा अशी अपेक्षा कधी केली नाही, मात्र इतिहास संशोधन मंडळाने याची दखल घेत फंदीच्या नावाने पुरस्कार सुरु केला. ही बाब गौरवास्पद आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्व वेगळे आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे साहित्य हे जीवनाचे महत्व सांगणारे साहित्य आहे. योग्य साहित्य व पुरस्कार यांची सांगड घालण्याचे काम मंडळ करत आहे असे खताळ यांनी सांगितले.
प्रा. सोपानराव देशमुख म्हणाले, पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून समाजाला नवे देण्याचा प्रयत्न केला आहे.     इतिहास संशोधन मंडळाच्या सदस्या अ‍ॅड. रंजना गवांदे, दिनकर साळवे, सुरेश म्हाळस यांचीही यावेळी भाषणे झाली. साहित्यिक किशोर पाठक व अनुराधा ठाकूर यांचीही यावेळी मनोगते झाली. आपला साहित्य विष्कार कसा घडला हे सांगतांनाच फंदींच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आमच्यासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन संतोष खेडलेकर यांनी केले तर आभार अ‍ॅड. सुरेश सराफ यांनी मानले.
पुरस्कारप्राप्त शाहिर शिवाजी कांबळे यांचा कलागौरव पुरस्काराने तर अनुराधा ठाकूर व किशोर पाठक यांचा कवी अनंत फंदी साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दादाजी बागुल, आनंद हरी, किरण भावसार व अनिल कांबळी यांच्या साहित्यालाही विशेष साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगमनेरातील शिक्षक अविनाश मोंढे व शेंडी येथील निवृत्त ग्रामसेवक पांडुरंग खाडगीर यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य व नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.