राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनाने पुनर्मूल्यांकनात प्रभावित १०० विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण प्रक्रियाच पुढे ढकलल्याने जे विद्यार्थी पुढील सत्रासाठी पात्र ठरले आहेत, त्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपर्यंत पूर्ण करायचा कसा असा यक्ष प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर आहे. चोवीस तास विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला तरच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो, मात्र ते अजिबात शक्य नाही ही वस्तुस्थिती आहे. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा येत्या ४ डिसेंबरला सुरू होत आहे. पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी देखील विद्यापीठाने १९ नोव्हेंबपर्यंत परीक्षेचे अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत अर्ज भरले. प्रभावित विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे पण त्यांची चार डिसेंबरपासून परीक्षा सुरू होणार असल्याने त्यांनी १५ दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करून अभ्यास करायचा कसा?
विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनात प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलल्या आणि परीक्षेला हजर रहायचे झाल्यास महाविद्यालयांकडून शपथपत्र आणण्याची अट ठेवली होती. अभियांत्रिकीच्या एका सत्रात सहा विषय आहेत. नियमानुसार पाठय़क्रम पूर्ण होण्यासाठी ४५ ते ५० पिरियड होणे गरजेचे आहेत तर प्रात्यक्षिकांसाठी २५ पिरियड होणे अनिवार्य आहेत. जर महाविद्यालयांतर्फे २४ तास पिरियड झाले तरच १५ दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य आहे. या पूर्ण प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विद्वत परिषदेतील विद्वानांनी असा निर्णय घेऊन एकप्रकारे शिक्षणाची गुणवत्ता रसातळाला नेली आहे तर संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्यानेही अर्धवट माहिती विद्यापीठ प्रशासनाला पुरवल्याचे स्पष्ट होते आहे.
दुसरीकडे प्राचार्य तीन महिन्यांचा पाठय़क्रम १५ दिवसात पूर्ण झाला म्हणून विद्यार्थ्यांस पत्र देण्यास फारसे उत्सुक नाहीत. कारण यासंबंधी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे नियम कठोर असून परिषद त्यावर आक्षेप घेऊ शकते, अशी भीती प्राचार्याना वाटत असल्याने ते कोंडीत सापडले आहेत. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्रवेश पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून असल्याचे पुनर्मूल्यांकनात प्रभावित विद्यार्थ्यांकडून शपथपत्रावर लिहून घेतले आहे. आम्ही अतिरिक्त वर्गाना उपस्थित राहून अभ्यासक्रम पूर्ण केल्याचाही उल्लेख विद्यार्थ्यांना शपथपत्रात करायला लावला आहे. एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, १५ दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून पत्र दिले जाईल.
 मात्र, त्यात अजिबात तथ्य नसेल. या सर्व प्रक्रियेत नेत्यांच्या दबावाला बळी पडलेल्या विद्यापीठाची फजिती होणार असल्याचे स्पष्ट दिसते.