स्थायी समितीच्या मंजुरीमुळे सावेडीतील महापालिकेच्या नियोजित नाटय़गृहाचे घोडे आज अखेर गंगेत न्हाले, मात्र तरीही ते अर्धेच न्हाले असून ठेकेदाराशी समिती सदस्यांची चर्चा झाल्यानंतरच त्याला खरा अर्थ प्राप्त होईल.
सावेडीतील नाटय़गृहासाठी प्रतिसादाअभावी सलग ५ वेळा निविदा काढण्याची नामुष्की मनपावर आली. ५ व्या वेळीही एकाच म्हणजे ए. सी. कोठारी या फर्मने निविदा दाखल केली. सजावट वगळता फक्त बांधकामाचे म्हणून ५ कोटी ७३ लाख ६५ हजार ४५६ रूपयांची निविदा मनपाने प्रसिद्ध केली होती. कोठारी यांनी ती २७. २७ टक्के जादा दराने दाखल केली. छाननी समितीबरोबरच्या चर्चेत कोठारी यांनी १४. ७२ टक्के जादा दराने काम करण्याचे (६ कोटी ५८ लाख ९ हजार ६५१ रूपये) मान्य केले. त्यानंतर प्रशासनाने मंजुरीसाठी हा विषय समितीसमोर ठेवला होता.
समितीतील बहुसंख्य सदस्यांनी कोठारी फर्मबाबत नाराजी व्यक्त करत ते फक्त कामे घेतात व अर्धवट करून नंतर सोडतात अशी तक्रार केली. समितीने त्यांना आज चर्चेसाठी उपस्थित रहायला सांगितले होते, मात्र परगावी असल्याने ते आले नाहीत. समितीने विषय मंजूर केला मात्र कोठारी यांच्याबरोबर करार करण्यापुर्वी समितीबरोबर त्यांची चर्चा घडवून आणावी असे प्रशासनाला सांगण्यात आले. काम कधी पुर्ण करणार यासंदर्भात त्यांच्याकडून स्पष्ट शब्दात लिहून घ्यावे व अटी शर्ती घालाव्यात अशी सूचना प्रशासनाला देण्यात आली.
सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या आज दुपारी झालेल्या सभेत १८ विषय मंजूर करण्यात आले. बहुसंख्य विषय प्रशासकीय स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यावर फारशी चर्चा न होता ते मंजूर झाले. राजीव आवास योजनेसाठी सर्वेक्षण करण्याचे काम घेतलेल्या वाप्कोस या ठेकेदार कंपनीबाबत प्रशासनाचा प्रतिकूल अभिप्राय आल्यानंतर त्यांची निविदा रद्द करत फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बांधकाम, आरोग्य या विभागातील नियुक्तयांना कार्योत्तर मंजुरी, मनपाच्या मालकीच्या काही जागा भाडेतत्वावर देणे असे काही विषय मंजूर करण्यात आले.