आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, परिषदेची फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषदेतर्फे वेणूताई चव्हाण यांचे माहेर असलेल्या फलटण येथे २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे आणि माजी आमदार उल्हास पवार या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी परिषदेच्या फलटण शाखेचे अध्यक्ष प्रा. मधुकर जाधव, संमेलनाचे कार्याध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ आणि कोशाध्यक्ष दिलीपसिंह भोसले उपस्थित होते. कृष्णा खोरे महामंडळमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची मुलाखत हे २६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सत्रात होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचा महाराष्ट्र’ या विषयावरील चर्चासत्रात राम प्रधान, यशवंतराव गडाख, श्रीनिवास पाटील आणि किशोर बेडकिहाळ यांचा सहभाग आहे. ‘यशवंतरावांची साहित्य सृष्टी आणि दृष्टी’ या विषयावर रा. गो. प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात अरुण शेवते, प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य रमणलाल शहा आणि प्राचार्य यशवंत पाटणे सहभागी होणार आहेत. उगवतीचे कविसंमेलन आणि निमंत्रितांचे कथाकथन होईल. ‘जागतिकीकरण आणि मराठी भाषेचा विकास’ या विषयावर प्रा. हरी नरके यांच्या अध्यक्षतेखाली २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चर्चासत्रात डॉ. विश्वनाथ िशदे, दीपक शिकारपूर, प्रसन्न जोशी आणि डॉ. राजेंद्र माने सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होणार आहे.