‘रोजी तर बुडाली नाही पाहिजे, पण मतदानही महत्त्वाचे आहे. सकाळीच आम्ही दोघं बी गेलो आणि मतदान करून आलो’. जयताळा परिसरातील एकात्मता नगरातील भोजराज शिंदाफोकडेने हे वास्तव मोठय़ा उत्साहात सांगितले. या परिसरात सर्वच रोजंदारीवर काम करणारे आहेत आणि म्हणूनच त्या सर्वानी आज सकाळी पहिल्याच फेरीत सात वाजता मतदान करून आपले कर्तव्य बजावले. जुना आणि नवीन फुटाळा परिसरातील झोपडपट्टीतील मिळून सुमारे सहा हजार मतदार आहेत. त्या सर्वामध्ये मतदानाचा उत्साह प्रचंड शिगेला पोहोचला होता. मानवता नगरातही परिस्थिती याहून वेगळी नव्हती. मतदान ओळखपत्र घेऊन ‘माझे नाव का नाही?’ असा जाबही विचारला जात होता. प्रत्येक निवडणुकीत या परिसरात ६० ते ७० टक्के मतदान होते. शहरातील सर्वच झोपडपट्टी परिसरात असलेला मतदारांमधील उत्साह आधुनिक व सुशिक्षित म्हणून मिरवणाऱ्यांच्या डोळयात झणझणीत अंजन घालणारा होता. त्याचवेळी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्स परिसरात मात्र स्मशान शांतता पसरलेली दिसून आली. ‘मतदान खरंच आहे का?’ असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. रामदासपेठ परिसरात मात्र बऱ्यापैकी चहलपहल दिसून आली. मतदानाचा उत्साह नसला तरी ‘कर्तव्य बजावायचे आहे’ ही जाणीव मतदारांच्या चेहऱ्यावरून जाणवत होती. ‘आली लहर, केला कहर’ म्हणत पावसाने घोळ केला खरा, पण या पावसाचा परिणाम झोपडपट्टी परिसरातील मतदारांवर झालेला नव्हता. उच्चभ्रू मतदारांनी पाऊस थांबण्याची वाट पाहणेच पसंत केले. सदरमधील उच्चभ्रू वस्तीतही मतदानाविषयीचा उत्साह फारसा नव्हता. या परिसरातील मतदारांना फक्त कर्तव्य बजावायचे होते, अशीच भावना त्यांच्या एकूण वागण्यातून दिसून आली.