शरद पोंक्षे यांची मुलाखत
डोंबिवली पूर्व येथील शिवप्रतिमा मित्रमंडळ क्रीडांगणात शनिवार ११ मे रोजी सायंकाळी ६.३० ते ९ या वेळेत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर पोंक्षे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
डॉ. योगेश घोडगे यांचे व्याख्यान
डॉक्टर तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत शनिवार ११ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात डॉ. योगेश घोडगे यांचे ‘अपस्मार (फीट) – कारणे, निदान आणि उपचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या वेळी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
दत्त मंदिराचे उद्घाटन
श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ठाण्यातील धोबी आळी, टेंभीनाका येथे उभारण्यात आलेल्या दत्त मंदिराचा उद्घाटन सोहळा ११ ते १३ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ११ आणि १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – प्रशांत हजारे – ९८१९११०७६६.
स्वामी विवेकानंदांची रथयात्रा
राज्यभर सुरू असलेली स्वामी विवेकानंदांची रथयात्रा ठाण्यामध्ये येत असून येत्या १० ते १२ मे या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ९ या वेळेत हा रथ ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे. रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण-विवेकानंद समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने हे ‘रथप्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंदांची छायाचित्रे, त्यांच्याशी निगडित विविध पुस्तके आणि जीवन चरित्र या प्रदर्शनात नागरिकांना पाहता येईल. १० मे रोजी हिरानंदानी इस्टेट येथील हकोन, ११ मे रोजी हिरानंदानी मिडोज येथील लोकपुरम आणि १२ मे रोजी तलावपाळी येथील सेंट जॉन शाळेजवळ हा रथ उभा केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८१९३६४३२२.
पर्यावरणावर आधारित चित्रपट
पर्यावरण दक्षता मंचतर्फे  शनिवार ११ मे रोजी दुपारी ३.३० ते ६ या वेळेत ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे ‘बायोडायव्हर्सिटी’ या विषयावर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच संस्थेच्या वतीने अलीकडेच भीमांशकर येथे आयोजित करण्यात आलेल्या निसर्ग सहलीचे छायाचित्र प्रदर्शनही या वेळी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २५४११६३३.
श्रीसिद्धिविनायक मंदिर उत्सवानिमित्त कार्यक्रम
सुयश कला, क्रीडा मंडळ, ठाणे पूर्वतर्फे १४ ते १६ मे या कालावधीत नातू परांजपे वसाहतीमध्ये श्रीसिद्धिविनायक मंदिर वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमात सायंकाळी  ६ वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघणार असून १५ मे रोजी श्रीगणेशयाग कार्यक्रमात १००१ मोदकांची आहुती देण्यात येणार आहे. त्याच दिवशी महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वेषभूषा स्पर्धा, स्थानिक कलावंतांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. १६ मे रोजी एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून रात्रो ८ वाजता बालसुरांची मैफील हा कमलेश भडकमकर यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी विकास पाटील (९८२०८७२४६२) वर संपर्क साधावा.