निशांत डांगे यांच्या चित्रांचे प्रदर्शन
स्त्रीचे सौंदर्य हा विषय निशांत डांगे यांनी ‘ट्रान्स्फॉर्मेशन’ या चित्रप्रदर्शनातून हाताळला आहे. पेपरवर चारकोल माध्यमात चितारलेली चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. स्त्रीच्या वयोमानपरत्वे बदलणाऱ्या भावावस्था, मूड टिपण्याचा प्रयत्न या चित्रांतून चित्रकाराने केला आहे. हे प्रदर्शन ७ ते १३ मे दरम्यान जहांगीर कला दालन, काळा घोडा येथे पाहायला मिळेल.
पुस्तक प्रकाशन
‘सिंफनी’, ‘झपाटा’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’ यांसारख्या कार्यक्रमांचे निर्माते कृष्णकुमार गावंड यांनी हिंदी चित्रपटातील गाणी सादर करणारे ऑर्केस्ट्रामधील कलाकार, हिंदी चित्रपटांची गाणी यावर अभ्यास करून लिहिलेल्या ‘सुरा मी वंदिले’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, ४ मे रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे केले जाणार आहे. द्वारकानाथ संझगिरी, संगीतकार अशोक पत्की, संगीतकार व निर्माता-दिग्दर्शक अवधूत गुप्ते हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ प्रकाशन व स्वरमुग्धा आर्ट्स यांच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत असून सर्वाना प्रवेश खुला आहे. या वेळी या पुस्तकावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणार असून त्याचे सूत्रसंचालन दीपाली केळकर करतील.
बच्चेकंपनीसाठी चित्रपट
शालेय सुट्टीनिमित्त एनसीपीएतर्फे बच्चेकंपनीसाठी अनेक छोटेछोटे उपक्रम हाती घेतले जातात. त्यापैकीच एक वर्ल्ड्स किड्स क्लब या उपक्रमांतर्गत वर्ल्ड किड्स फाऊण्डेशनच्या सहकार्याने सात ते चौदा वयोगटातील मुलामुलींसाठी जपानी चित्रपट शनिवारी सकाळी ११ वाजता एनसीपीए संकुलातील लिट्ल थिएटर येथे दाखविण्यात येईल. ‘किकीज डिलिव्हरी सव्‍‌र्हिस’ असे या चित्रपटाचे नाव असून हयाओ मियाझकी त्याचे दिग्दर्शक आहेत.
‘शेवटच्या श्वासापर्यंत जगताना’  
बोरिवली पश्चिम येथील आचार्य अत्रे कट्टाच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त इंडस सोर्स बुक्स प्रकाशनाच्या सहकार्याने एका विशेष चर्चेचे आयोजन ५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. ‘शेवटच्या श्वासापर्यंत जगताना’ असे या चर्चात्मक कार्यक्रमाचे नाव असून जीवन आणि मृत्यू यासंदर्भात ही चर्चा केली जाणार आहे. ‘इंटिमेट डेथ’ या डॉ. मारी डी हेनेझेल लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन या वेळी केले जाणार आहे. यानिमित्त होणाऱ्या चर्चेत सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ व ‘वॉर्ड नंबर पाच’चे लेखक डॉ. रवी बापट, अ‍ॅड. श्रीकांत भट, ‘एक होता काव्‍‌र्हर’फेम लेखिका वीणा गवाणकर यांचे विचार ऐकण्याच संधी रसिकांना मिळणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली पश्चिम येथे हा कार्यक्रम होणार आहे.
अमूर्त चित्रांचे समूह प्रदर्शन  
प्रदर्शक कला दालनातर्फे दोन टप्प्यांमध्ये ‘फ्रेण्ड्स ऑफ प्रदर्शक’ या नावाने काही चित्रकारांचे पहिल्या टप्प्यात प्रदर्शन भरविण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात अमूर्त शैलीतील चित्रांचे समूह प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्यामध्ये अंजूम मोतीवाला, अनुजा पातुरकर, रावसाहेब गागरे, साधना राडी, सुनीता पवार, योगेश पाटील यांची चित्रे मांडण्यात आली आहेत. अ‍ॅक्रिलिक, तैलरंग अशा विविध माध्यमांतील ही अमूर्त चित्रे असून गॅलरी प्रदर्शक, १००, कल्पना बिल्डिंग, प्लॉट नं. ३३८, बारावा रस्ता, खार पश्चिम येथे ४ मेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळतील.