‘जागर आरोग्याचा’
‘ग्रंथाली’, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’, ‘ग्रंथसखा वाचनालय’ आणि ‘सवेंग फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते ११ जून या कालावधीत मंगल कार्यालय, गणेश चौक, बदलापूर येथे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रंथ प्रदर्शन, शिबिरे आणि दर्जेदार व्याख्याने यांचा समावेश असलेला ‘जागर आरोग्याचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत ८ ते ११ जून या कालावधीत सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ जून रोजी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.स्नेहलता देशमुख या ‘गर्भसंस्कार आणि स्त्री आरोग्य’ या विषयावर संवाद साधणार असून ९ जून रोजी डॉ.संजय ओक यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १० जून रोजी डॉ.अश्विनी सावंत या ‘हार्ट अ‍ॅटॅक टाळता येईल का?’ या विषयावर तर ११ जून रोजी न्यूरोस्पामनल तज्ज्ञ डॉ. पी. एस. रामाणी ‘जीवन आणि स्वास्थ्य’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यावेळी डॉ. रामाणी यांचा सत्कार केला जाणार आहे. वरील चारही दिवशी व्याख्यानांबरोबरच आरोग्य तपासणी शिबिर आणि ग्रंथ प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांना अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ७७०९७६७०६७
‘कलर्स ऑफ व्हायोलिन’
ठाणे जिल्ह्य़ातील कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या ‘ठाणे डेफ वेलफेअर’ संस्थेसाठी निधीसंकलन करण्याच्या उद्देशाने रविवार ९ जून रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गडकरी रंगायतन येथे अंधेरी येथील ‘रायकर अकादमी ऑफ व्हायोलिन’ तर्फे ‘कलर्स ऑफ व्हायोलिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रायकर अकादमी ऑफ व्हायोलिनमधील कलाकार भारतीय शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाटय़संगीत, भजन, पारंपरिक तसेच पाश्चात्त्य संगीताची सुरेल मैफल सादर करणार आहेत. संस्थेचे गुरू आणि व्हायोलिनवादक मिलिंद रायकर व्हायोलिन वादनातून त्याच्या गायकी अंगाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. यावेळी तबल्यावर पं. कालिनाथ मिश्रा साथ करणार असून ते बंद मुठीने तबलावादन करणार आहेत. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कीर्ती आगाशे करतील. अधिक माहितीसाठी – ९५९४०९६५८१ / ९९२०४४१०१०

शनिवारी उलगडणार जादूची ‘पेटी’
मूळचे पाश्चिमात्य परंतु गेल्या सव्वाशे वर्षांत भारतीय संगीताचा अविभाज्य घटक असलेल्या हार्मोनिअम ऊर्फ पेटी सुरावटींची बहारदार मैफल – जादूची ‘पेटी’ शनिवार ८ जून रोजी रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय, नाटय़, सिनेमा, कव्वाली, भावसंगीत अशा विविध संगीत प्रकारांमध्ये पेटी हे वाद्य कसे वाजते यांचे अनोखे प्रात्यक्षिक आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू हे तरुण कलाकार सादर करणार आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, शमशाद बेगम, वसंतराव देशपांडे, मोहम्मद रफी, किशोर कुमार, सी.रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई, सुधीर फडके, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिसन, अजय-अतुल यांसारख्या दिग्गज गायकांनी गायलेल्या तसेच संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यामातून रसिकांना घेता येणार आहे. हार्मोनिअमवर येणाऱ्या विविध वाद्यांचे आवाज तसेच बोटांची करामत यांचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमांतर्गत रसिकांना अनुभवता येणार आहे. यावेळी तबल्यावर प्रसाद पाध्ये आणि तालवाद्यावर मंदार गोगटे साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम केळकर करतील. विराट सामाजिक आणि सांस्कृतिक मंचतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८९२२३६५९२
दासबोध पारायण आणि कीर्तन
शुभलहरी प्रतिष्ठानतर्फे १० ते १६ जून या कालावधीत विठ्ठल सायना दत्त मंदिर, दमाणी इस्टेट, एलबीएस मार्ग, ठाणे येथे दासबोध पारायण आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते १२ यावेळेत योगेश रामदासी दासबोधाचे वाचन करतील. तसेच रात्री ७.३० ते ९.३० यावेळेत मकरंद रामदासी कीर्तनाचा कार्यक्रम सादर करतील. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – अलकनंदा जोशी – ९२२३२३२८६४, प्रज्ञा कुलकर्णी – ९८६९०५०२२७
ठाण्यामध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’
अभिनय कट्टय़ातर्फे रविवार ९ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथे पु.ल.देशापांडे लिखित ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकातील व्यक्तिरेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी ‘सुफीयारी’ अलबमचे गायक नंदेश उमप यांच्या मुलाखतीचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
अंबरनाथमध्ये करिअर मार्गदर्शन
दहावी, बारावीनंतर उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधींविषयी विद्यार्थी तसेच पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने अंबरनाथ शिवसेना विभागाच्या वतीने रविवार ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता रोटरी क्लब हॉल, वडवली विभाग, अंबरनाथ (पू) येथे करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शोभा सुभेदार ‘करिअरच्या विविध वाटा व समुपदेशन’, प्रा.मिलिंद कोळी ‘मॅनेजमेंट क्षेत्रातील संधी’, प्रा. सुरेश दाते ‘स्पर्धा परीक्षा (एमपीएससी, युपीएससी)’ आणि संतोष कामेरकर ‘यशाची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करतील.