स्पेनच्या बर्सिलोना येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय डायबेटिक फूट परिषदेत आंतरराष्ट्रीय डायबेटिक फूट वर्किंग समूहाचे अध्यक्ष डॉ. कारेल बाकर यांच्या हस्ते डॉ. शरद पेंडसे यांच्या ‘डायबेटिक फूट’ या व्यवस्थापनावरील नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तकात २२ अध्याय आहेत. त्यामध्ये यूएसए, युरोप, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, आफ्रिका आणि भारतासह जगभरातील आघाडीच्या डायबेटिक फूट तज्ज्ञांनी डायबेटिक फूट व्यवस्थापनासंबंधी सर्व बारकाव्यांवर प्रकाश टाकला आहे. नवी दिल्लीच्या जेपी ब्रदर्सतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे संपादन नागपूरचे डायबेटिक तज्ज्ञ डॉ. शरद पेंडसे यांनी केले आहे. यापूर्वी डॉ. पेंडसे यांनी ‘डायबेटिक फूट-ए क्लिनिकल एटल्स’ हे पुस्तक लिहिले आहे. दहा वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही देशविदेशात लोकप्रिय आहे.
भारतात डायबेटिक मेलिट्स एक प्रमुख आरोग्यासंबंधी समस्या होत चालली आहे आणि एका अभ्यासानुसार भारतात ६० मिलियन लोक प्रकार २ मधुमेहाचे रुग्ण आहेत. मधुमेहाने होणाऱ्या कॉप्लिकेशन्सपैकी डायबेटिक फूट हे सर्वाधिक कठीण आहे. या कॉप्लिकेशन्सला वेळीच आळा न घातल्यास रुग्णाचा पाय देखील कापावा लागू शकतो. भारतात दरवर्षी एक लाख रुग्णांचे पाय याच कारणास्तव कापावे लागतात. यात सुमारे ७५ टक्के पायांना कापणे टाळले जाऊ शकते. रक्ताचा पुरवठा कमी झाल्याने डायबेटिजच्या रुग्णांना पायाच्या संवेदन क्षमता समाप्त होणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा पायांमध्ये सारखे अल्सर, संक्रमण किंवा गँगरिन सारख्या समस्या निर्माण होतात. यामुळेच बरेचदा पाय कापण्याची गरज भासते. या आजारासंदर्भात जागरूकतेचा अभाव, उघडय़ा पायाने फिरण्याची सवय, होम सर्जरी, चुकीचे फुटवियर आणि उशिरा माहिती मिळाल्याने या समस्या आणखीनच वाढतात. डायबेटिक फूटवर प्रकाशित या नवीन पुस्तकात यासंदर्भात माहिती दिली आहे. या पुस्तकाच्या विक्रीतून येणारा निधी बाल मधुमेहींसाठी कार्यरत असणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्ट ‘ड्रिम ट्रस्ट’ मध्ये देण्यात येईल.