मराठवाडय़ाच्या आर्थिक अनुशेषासंदर्भात आंदोलने, चळवळी मोठय़ा प्रमाणावर झाल्या. परंतु मराठवाडय़ाच्या सांस्कृतिक विकासाकडे सर्वानीच दुर्लक्ष केल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोराडे बोलत होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठ परिसरात दहा वर्षांनंतर केंद्रीय महोत्सव होत असून ११० महाविद्यालयांतील सुमारे २ हजार कलावंत सहभागी झाल्याचे डॉ. चेतना सोनकांबळे यांनी या वेळी सांगितले. पोटाच्या भूकेसारखीच सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. युवक महोत्सव म्हणजे तरुणांच्या आत्मशोधाचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी सांगितले, असेही बोराडे म्हणाले.
संजयकुमार यांनी सांगितले की, प्रत्येक पिढीतील तरुण सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे आपली संस्कृती घडवत असतात. त्यामुळे या पिढीला नावे न ठेवता त्यांच्या विचारांचे आपण स्वागतच केले पाहिजे. स्वत:ला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना शिक्षण, करिअर व स्वत:चा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. पांढरीपांडे यांनी, सचिन तेंडुलकर व प्रा. सी. एन. आर. राव यांना घोषित झालेल्या भारतरत्न पुरस्कारांतून कला, क्रीडा व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या लिखीत भाषणातील महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले. मराठवाडा जशी संतांची भूमी आहे, तशी आता कलावंत व साहित्यिकांची भूमी म्हणून नोंद झाल्याचे कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांनी सांगितले,
डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. अप्पासाहेब हुंबे, प्रा. संभाजी भोसले, अॅड. सुभा, राऊत, करुणा जाधव अॅड. सुभाष राऊत, डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. डॉ. समाधान कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. करुणा जाधव हिने आभार मानले.