स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा शिवनेरी २०१३ या युवक महोत्सवाचे निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. मंचावर स्वागताध्यक्ष तथा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खा. डॉ. जे. एम. वाघमारे, सिनेअभिनेत्री पौर्णिमा भावे, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष सुनीता चोपणे आदींची उपस्थिती होती.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून कलेचे माहेरघर आहे. युवक महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाची जोपासना करता येते. आज युवाशक्ती महत्त्वाची असून त्यासाठी फक्त शिक्षण पुरेसे नसून त्यांचा गुणात्मक विकास हवा आहे. युवकांच्या सुप्तगुणांना संधी देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देण्याचे कार्य युवक महोत्सवातून घडावे. ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देणारे हे व्यासपीठ आहे. पारंपरिक शिक्षणात बदल करून आता कुशल मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. सर्वागीण विकास हा शिक्षणाचा पाया असून, जीवन परिपूर्ण करण्यासाठी युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करताना आई, वडिलांच्या संस्काराला तडा जाऊ देऊ नये, असे आवाहन केले.
सिनेअभिनेत्री पौर्णिमा भावे यांनी उपस्थित महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधला. कुलगुरू डॉ. विद्यासागर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. प्राचार्य एरंडे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी खा. जे. एम. वाघमारे, अशोकराव पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज भोसले यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बी. एस. गायकवाड यांनी मानले. या युवक महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यापीठ क्षेत्रातील ९१ महाविद्यालयांतील सुमारे १५०० विद्यार्थी-विद्याíथनींनी महाराष्ट्राची लोकपरंपरा व कलाप्रकारांचे सादरीकरण करणाऱ्या भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते.
संभाजी पाटलांसह कार्यकर्त्यांना अटक
मंत्रिमहोदयांनी स्वीकारले आंदोलनकर्त्यांचे निवेदन
सोयाबीनला ५५०० रुपयांचा हमीभाव जाहीर करावा व तोडण्यात आलेल्या शेतकऱ्यांची वीजजोडणी जोडावी अन्यथा मंत्र्यांना निलंग्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देणारे भाजप प्रदेश सरचिटणीस माजी आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, रामचंद्र तिरुके, अजित माने, संजय दोरवे आदींसह निवडक पदाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस प्रशासनाने अटक केली. युवक महोत्सव व विकासकामाच्या उद्घाटनास कोणताही अडथळा येऊ नये व कोणताही अनुचित प्रकार आंदोलनकर्त्यांकडून घडू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आंदोलनकर्त्यां नेत्यांना पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त करीत रविवारी सकाळपासूनच शहरात बंदचे आवाहन करून बाजारपेठ बंद पाडली. यामुळे शहरात दिवसभर तणावसदृश परिस्थिती होती. तगडय़ा पोलीस बंदोबस्तामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. शासकीय विश्रामगृह निलंगा येथे मंत्री हर्षवर्धन पाटील व सतेज पाटील यांनी माजी खा. रूपाताई पाटील यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पद्धतीने विचार करून मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या वेळी उदगीरचे आ. सुधाकर भालेराव, अहमदपूरचे माजी आमदार खंदारे यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते.