नीरा नदीवरील पुलावर नुकत्याच झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून या परिसराचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश केला आहे. या जागेबरोबरच सातारा जिल्ह्य़ातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर महामार्गावरील अन्य आठ क्षेत्रे अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) असल्याचा शोध प्राधिकरणाने घेतला आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील पुणे आणि सातारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर नीरा नदीत मोटार पडून नुकताच चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर घटनास्थळाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने प्रकल्प संचालक राजेशकुमार कुडल यांनी या परिसराची नुकतीच पाहणी केली. यामध्ये वरील जागी असलेल्या पुलाच्या रचनेत काही दोष आढळले आहेत. या परिसरात नीरा नदीवरील दोन पुलांच्या दरम्यान मोकळी जागा असल्याने त्याद्वारे एखादे वाहन नदीपात्रात जाण्याचा धोका आहे. याबाबत सूचना करणारी, अशा वाहनांना रोखणारी कसलीही यंत्रणा इथे नाही. या साऱ्यांचा विचार करून जागेचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश केला आहे.
या शिवाय पुणे ते सातारा दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याचीच पाहणी या वेळी करण्यात आली. या अंतर्गत यातून िशदेवाडी (ता. खडाळा), वेळे ,कवठे, जोशीविहीर, भुईंज, पाचवड, फलटण फाटा आणि गोडोली अशा आठ जागांचा समावेश अपघातप्रवण क्षेत्रात (ब्लॅकस्पॉट) समावेश केला आहे. या सर्व ठिकाणी रस्त्यांना तीव्र उतार, चढ, दोषपूर्ण दुभाजक, धोकादायक वळणे, गावा-शहरांचे फाटे आदी गोष्टीतील दोष आढळून आले आहेत.
दरम्यान महामार्गावरील अपघातात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली असून याला खराब आणि दोषयुक्त रस्ता, त्यावरील अपघातप्रवण जागा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावरून टोल वसुली करणारी कंपनी आणि प्राधिकरणाच्या विरोधात वाहनचालकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी या अशा रस्त्यावर जर अपघात झाले, तर प्राधिकरण, रस्ते विकासक ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.