शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या नागपूर, पुणे येथील कार्यालय व निवासस्थानावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाचवेळी छापे घातले. या छाप्यात महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. हा व्यावसायिक राज्यात सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांच्या जवळचा समजला जातो. असे असताना हा प्रकार म्हणजे, त्याच्या वर्चस्वाला शह असल्याचे समजले जात आहे.
प्रफुल्ल गाडगे असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून त्यांचे मेहाडिया चौकातील पाच मजली इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ‘वास्तुविहार बिल्डर्स’ नावाने कार्यालय आहे. या व्यवसायात त्यांचे बंधू चंदू गाडगे यांची भागीदारी आहे. गाडगे यांच्या पुत्राचे काही दिवसांपूर्वी नागपुरात तर मुलीचे इंदोर येथे लग्न पार पडले. विवाहानिमित्त नागपुरातील व्हीसीए मैदानावर तर इंदोर येथे मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, चित्रपट अभिनेत्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे ही मेजवानी शहरात चांगलीच चर्चेत आली होती. इंदोर येथे पार पडलेल्या मेजवानीसाठी गाडगे यांनी एक विमानच आरक्षित केले होते. त्यात शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.
मेहाडिया चौकातील कार्यालयात शुक्रवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. तर एका चमूने त्यांच्या रहाटे कॉलनी येथील निवासस्थानावरही छापा टाकला. तर तिसऱ्या चमूने पुणे येथील कार्यालयावरही छापा टाकल्याचे वृत्त आहे. या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती सापडली आहे. गाडगे बंधूंनी नागपूर, वर्धा, बुटीबोरी, उमरेड, अमरावती मार्ग, भंडारा मार्गासह मध्यप्रदेशातील इंदोर येथे मोठय़ा प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. गाडगे बंधूंनी आयकर न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.