फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्व मुक्त मार्गाचा दुसरा टप्पा, सांताक्रूझ चेंबूर जोड रस्ता प्रकल्प आणि मेट्रो रेल्वे सुरू करण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाचे दावे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा हवेत विरले आहेत. मुंबईच्या नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात भर टाकणारे प्रकल्प पूर्ण करण्यात अपयशी ठरण्याची ‘एमएमआरडीए’ची परंपरा आणि मुंबईकरांची परवड सुरूच राहिली आहे.

दक्षिण मुंबईला थेट पूर्व उपनगरांशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या साडेसोळा किलोमीटर लांबीच्या पूर्व मुक्त मार्ग प्रकल्पाचा साडेतेरा किलोमीटरचा टप्पा जूनमध्ये खुला झाला असला तरी पुढचा आणि शेवटचा सुमारे तीन किलोमीटचा उन्नत मार्गाचा रस्ता डिसेंबर २०१३ मध्ये पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले. नंतर फेब्रुवारी-मार्चचा मुहूर्त जाहीर करण्यात आला. पण तोही आता हुकला आहे.
काही वर्षांपूर्वी प्राधिकरणाचे तत्कालीन महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या काळात दणकून घोषणा करण्याचे, प्रकल्प पूर्ण होण्याचे महत्त्वाकांक्षी मुहूर्त जाहीर करण्याचे तंत्र ‘एमएमआरडीए’ने अवलंबले होते. ते मागच्या वर्षीपर्यंत सुरू राहिले. दरवर्षी नवीन वर्षांच्या सुरुवातीला जाहीर केलेले मुहूर्त गाठण्यात अपयश येत असल्याने ‘एमएमआरडीए’च्या प्रकल्पांचे मुहूर्त हा चेष्टेचा विषय झाला होता. नवीन महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी बहुधा त्यामुळेच आता असल्या तारखांच्या घोषणांना लगाम घातला आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे हा ११.४ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे दावे केले जात होते. १२ स्थानके असलेल्या या प्रकल्पामुळे वसरेवा-घाटकोपर अंतर ७० मिनिटांवरून २० मिनिटांवर येईल. चार डब्यांच्या मेट्रोची प्रवासी क्षमता ११७८ आहे. मूळ प्रकल्प खर्च २३५६ कोटी पण आता तो ४३०० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र व त्यासाठीच्या चाचण्यांना अवधी लागत असल्याने हा प्रकल्प मार्च २०१४ पर्यंत पूर्ण होणे अशक्य असल्याचे आणि मुहूर्त हुकत असल्याचे ‘लोकसत्ता’ने आधीच स्पष्ट केले होते. तसेच झाले आहे. हा प्रकल्प लोकसभा निवडणुकीनंतरच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी कधीतरी सुरू होईल.
सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक वाहतूक प्रकल्प. ठाणे आणि नवी मुंबईहून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या वाहनांना विमानतळाशी थेट जोडणारा हा रस्ता असल्याने शीव येथे वळसा घालण्याची गरज पडणार नाही. रोज ५० हजार वाहनांना लाभ होणार आहे. पण अमर महाल जंक्शन उड्डाणपूलाचे काम रखडल्याने सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प रखडला आहे. या उड्डाणपुलामुळे जोडरस्ता आणि आणि पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. पण ‘लवकरच’ खुला करण्यात येत असल्याचा गवगवा करण्यात येत असलेला हा प्रकल्प आणखी दीड-दोन महिने तरी पूर्ण होणार नाही.