मोठय़ा प्रतीक्षेनंतर बांधकाम सुरू झालेल्या वांगणी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम अर्धवट ठेवून रेल्वेने या भागात सायडिंग यार्डच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वांगणी स्थानकातील रेल्वे पूल अधांतरीच असून त्याचा कोणताच फायदा येथील प्रवाशांना होत नाही.उलट पादचारी पुलाच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ‘सायडिंग यार्ड नको पण पूल बांधा’ असा पवित्रा रेल्वे प्रवाशांनी घेतला असून अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी संघटनांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.
झपाटय़ाने शहरीकरण सुरू असलेल्या वांगणी गावाची लोकसंख्या वीस हजारांहून अधिक आहे. स्वस्त घरांमुळे वांगणीची लोकसंख्या आणि पर्यायाने या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील या स्थानकामध्ये एक पादचारी पूल असावा या मागणीसाठी प्रवाशांनी बराच संघर्ष केल्यानंतर रेल्वेने एका पादचारी पुलास मंजुरी दिली. मात्र या पुलाचे एका बाजूचे काम झाल्यानंतर ते बांधकाम अर्धवट अवस्थेतच ठेवण्यात आले. त्यामुळे कर्जतकडे जाणारे रूळ ओलांडून जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. परिणामी अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या रुळावर दोन प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याने या भागात संतापाची लाट पसरली होती.
रेल्वे प्रवासी संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेस निगम आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुलाच्या रखडलेल्या कामाची माहिती करून देण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद प्रवासी संघटनेला मिळू शकला नाही. त्यात रेल्वेने याभागात सायडिंग यार्डाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला. आधी ‘पादचारी पूल पूर्ण करा आणि त्यानंतरच यार्डचे काम सुरू करा’, अशी मागणी आता प्रवासी करू लागले आहेत. सायडिंग यार्डाचे काम झाल्यानंतर वांगणी पश्चिमेतील डोणेवाडी, वीर सावरकरनगर अशा भागातील लोकांना स्थानकात येण्यास अडचण होणार आहे. अपुऱ्या रेल्वे पुलामुळे पूर्वेकडील सूर्योदयनगर भागातील रहिवाशांना रूळ ओलांडण्याचा धोका पत्करावा लागतो आहे. त्यामुळे कर्जत दिशेकडेही पादचारी पुलाची गरज असल्याची प्रवाशांची मागणी आहे.
स्थानकावरील निवारा शेड ही रखडलेलीच..
वांगणी स्थानकामधील पादचारी पूल आणि स्थानकातील निवारा शेड यांची कामे २०१४ मध्ये पूर्ण करण्यात येईल. तसेच या कामासाठी १ कोटी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे लेखी उत्तर रेल्वे प्रशासनाने उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत दिले होते. या बैठकीला वर्ष उलटले तरी दोन्ही कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळेच पादचारी पूल पूर्ण झाल्याशिवाय लोकलचे सायिडग यार्ड सुरू करू नये, असा इशारा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आला होता, अशी माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मनोहर शेलार यांनी दिली.