कळवण जिल्हा रुग्णालयाची अवस्था
शल्यचिकित्सक व भूलतज्ज्ञ यांची नाशिक जिल्हा रुग्णालयात बदली झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोघांची उणीव जाणवत आहे. शस्त्रक्रिया करणे अशक्य झाले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. के. शेळके यांनी दिली.
अतिदुर्गम आदिवासी भागात हे १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आहे. रुग्णांना आवश्यक सेवा देण्यासाठी तज्ज्ञांची सर्व पदे भरली जाणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी आजही सुमारे २२ पदे रिक्त असल्याचे कळते. शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सक व भूलतज्ज्ञ ही पदे त्वरित भरणे अत्यावश्यक आहे. महिना होऊनही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी इतरत्र खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत असे शस्त्रक्रियागृह असून, या ठिकाणी २४ तास अपघात विभाग कार्यरत आहे. अशा ठिकाणी शल्यचिकित्सक व भूलतज्ज्ञ ही पदे आवश्यक आहेत. ही पदे रिक्त असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाला सामोरे जावे लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्रक्रमाने ही पदे भरण्यात यावीत यासाठी आपण आरोग्य सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पत्रव्यवहार केला असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले. रुग्णालयात इतर पदे त्वरित भरावीत यासाठी संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी व तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.