धावत्या रिक्षांमधील महिलाही लक्ष्य
शहरातील रस्त्यांवरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच मंगळसूत्र खेचण्याचे प्रकार सोनसाखळी चोरटय़ांकडून सुरूच असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता या चोरटय़ांनी रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांनाही लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या चोरटय़ांवर ठाणे पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याने दिवसेंदिवस शहरामध्ये सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव तसेच त्यांची मजल वाढू लागली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीविषयी महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
सोन्याचे दागिने घालून रिक्षाने प्रवास करणाऱ्या महिलांना हेरायचे, त्यांच्या रिक्षाचा मोटारसायकलने पाठलाग करायचा, मोटारसायकल रिक्षाच्या बाजूला नेऊन पाठीमागे बसलेला साथीदार रिक्षातील महिलेचे दागिने खेचतो आणि त्यानंतर मोटारसायकल भरधाव घेऊन पोबारा करायचा, असा काहीसा प्रकार सोनसाखळी चोरटय़ांकडून शहरात सुरू झाला आहे. रविवारी दुपारी दिवा भागात राहणाऱ्या लता संतोष भोईर (२६) या आपल्या पती व मुलासह घोडबंदर येथील ब्रह्मांड सिग्नल परिसरातून रिक्षाने जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने खेचून पोबारा केला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे आता रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलाही असुरक्षित असल्याची बाब समोर आली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत कळवा भागात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या असून त्यामध्ये सोनसाखळी चोरटय़ांनी महिलांच्या गळ्यातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने खेचून नेले आहेत. या घटनांमुळे सोनसाखळी चोरटय़ांचा शहरात उपद्रव सुरूच असल्याचे आता उघड होऊ लागले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव वाढू लागला असून या चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी ठाणे पोलिसांनी अनेक उपाययोजना राबविल्या. पण, त्याचा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. या उलट सोनसाखळी चोरटय़ांनी बिनधास्तपणे आपला उपद्रव सुरूच ठेवला आहे. या चोरटय़ांची भीड चेपल्याने दिवसेंदिवस त्यांची दरमजल वाढू लागली असून सोनसाखळी चोरी करण्यासाठी त्यांच्याकडून नव्या क्लृप्त्या लढविल्या जात असल्याचे उघड होऊ लागले आहे. या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. पण, तरीही सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव सुरूच आहे.
मध्यंतरी, ठाणे पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालयात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले होते. त्यामुळे चोरटय़ांचा उपद्रव काहीसा कमी झाला होता. पण, काही महिन्यांनंतर सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. तसेच या गुन्ह्य़ांना पायबंद बसावा, यासाठी ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरटय़ांविरोधात जबरी चोरी आणि मोक्कांतर्गत कारवाई सुरू केली. पण, त्याचा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांवर काहीच परिणाम झालेला दिसून येत नाही. या उलट सोनसाखळी चोर अधिकच सक्रिय झाले आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या कामगिरीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्हे उभी राहू लागली आहेत.

घरफोडीही सक्रियच..
सोनसाखळी चोरांपाठोपाठ आता घरफोडेही सक्रिय असल्याचे स्पष्ट होऊ लागले असून ठाणे शहरामध्ये गेल्या दोन दिवसांत घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. शहरातील महात्मा फुले भाजी मार्केटजवळ असलेल्या वाघेला चहा डेपो या दुकानाचे शटर उचकटून चोरटय़ांनी सुमारे ८० हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वर्तकनगर येथील आदर्श सोसायटीमध्ये राहणारे महेश शिंगरे यांच्या घराची कडी कापून चोरटय़ांनी दोन लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.